Volcanic Eruptions: रशियातील अतिप्रचंड तीव्रतेच्या भूकंपानंतर जपानपर्यंत त्याचे पडसाद दिसून आल्यानंतर आता सारं जग आणखी एका मोठ्या संकटाच्या गर्त छायेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Volcanic Eruptions: रशियाच्या कामचटका इथं 30 जुलै 2025 रोजी आलेल्या भीषण भूकंपानंतर त्याचे परिणाम दूरवर दिसणार असल्याची चिंता व्यक्त करत संशोधकांनी रिंग ऑफ फायरमध्ये अनेक ज्वालामुखींचा उद्रेक होणार असल्याचा स्पष्ट इशारा दिला होता.
रिंग ऑफ फायर हा तोच भाग आहे, जो पॅसिफिक समुद्राच्या चारही बाजुंनी साधारण 40 किमीपर्यंतच्या अंतरात पसरला आहे आणि या भागात 425 हून अधित जिवंत ज्वालामुखी आहेत.
रशियातील भूकंपानंतर कामचटका इथं असणाऱ्या क्राशेनिननिकोव ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यातून रात्रभर 6 किमी उंचीपर्यंत राख पाहेर पडल्यानं आजुबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.
यानंतर लगेचच कुरील बेट समुहामध्ये 7.0 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला आणि मागोमागच त्सुनामीचा इशारा देण्यात आला. शास्त्रज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार अद्यापही भूकंपाचं हे सावट दूर झालं नंसून 'आफ्टरशॉक्स'चा धोका कायम आहे.
क्राशेनिननिकोव ज्वालामुखीचा यापूर्वी 15 व्या शतकात उद्रेक झाला असून, भूकंपाच्या धक्क्यामुळं या ज्वालामुखीचा उद्रेक झाला.
रशियाचं कामचटका हे क्षेत्र रिंग ऑफ फायरमध्येच असून, तिथं जिवंत ज्वालामुखींचा मोठा धोका असल्याचं संशोधकांनी यापूर्वीसुद्धा अनेकदा स्पष्ट केलं होतं.
अभ्यासकांच्या मते भूकंपामध्ये प्रचंड उर्जा असून, त्यामुळं पृथ्वीच्या उदरात प्रचंड उर्जा निर्माण होते आणइ त्यातूनच ज्वालामुखीखाली असणारा मॅग्मा अस्थिर होऊन प्रचंड स्फोट होतात.
दरम्यान कामचटकानंतर झालेल्या क्राशेनिननिकोव ज्वालामुखीच्या स्फोटाची घटना ऐतिहासिक असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय भूकंपांची ही शृंखला सुरूच राहिल्यास साऱ्या जगावर ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळं मोठं सावट असल्याची चिंतासुद्धा व्यक्त केली जात आहे.