नोकरी पूर्ण केल्यावर अनेकजण आपल्या गावी जाऊन राहतात. अशावेळी त्यांना पेन्शन मिळण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात. पम EPFO शी संबंधीत पेन्शनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
EPFO: नोकरी पूर्ण केल्यावर अनेकजण आपल्या गावी जाऊन राहतात. अशावेळी त्यांना पेन्शन मिळण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात. पम EPFO शी संबंधीत पेन्शनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
सेवानिवृत्ती निधी संस्था ईपीएफओने देशभरातील त्यांच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम (CPPS) सुरू केली जात आहे.
ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर कोणताही लाभार्थी कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकणार आहे. आता पेन्शन सुरू करताना पडताळणीसाठी बँकेत जाण्याची गरज नाही. तसेच रक्कम जारी झाल्यानंतर ती लगेच जमा केली जाईल, अशी माहिती कामगार मंत्रालयाने दिली. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
जानेवारी 2025 पासून लागू होणाऱ्या CPPS प्रणालीद्वारे संपूर्ण भारतात पेन्शनचे वितरण केले जाईल. आता पूर्वीप्रमाणे पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजेच पीपीओ एका कार्यालयातून हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही. पेन्शनधारक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला किंवा त्याची बँक किंवा शाखा बदलली तरीही त्याला पेन्शन मिळताना कोणती अडचण येणार नाही.
केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणालीचा पहिला प्रोजेक्ट गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये कर्नाल, जम्मू आणि श्रीनगर प्रादेशिक कार्यालयांमध्ये पूर्ण झाला. ज्यामध्ये 49 हजार ईपीएस पेन्शनधारकांना सुमारे 11 कोटी रुपयांची पेन्शन वितरित करण्यात आली.
दुसरा पायलट प्रोजेक्ट नोव्हेंबरमध्ये 24 प्रादेशिक कार्यालयांमध्ये सुरू करण्यात आला. जिथे 9.3 लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारकांना सुमारे 213 कोटी रुपयांची पेन्शन वितरित करण्यात आले. पेन्शन सेवा वाढविण्याच्या दिशेने उचललेले एक ऐतिहासिक पाऊल आहे.
डिसेंबर 2024 साठी EPFO च्या सर्व 122 पेन्शन वितरण क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना सुमारे 1,570 कोटी रुपयांची पेन्शन वितरित केली.
EPFO च्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये CPPS ची पूर्ण प्रमाणात अंमलबजावणी करणे हा एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले. हा एक परिवर्तनकारी उपक्रम असून निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये कोणत्याही बँकेतून, कोणत्याही शाखेतून, देशात कुठेही सोयीस्करपणे पेन्शन काढता येईल, असेही ते म्हणाले.