इन्स्टाग्रामवर 21 लाख 70 हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या या अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार मुलाखतीत सांगितला. नक्की ती म्हणाली जाणून घ्या...
या अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार सांगताना या घटनेनंतर तिचा दृष्टीकोन बदलला आणि तिने एक मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं. नक्की काय म्हणाली ही अभिनेत्री आणि तिच्यासोबत काय घडलेलं हे जाणून घेऊयात तसेच तिने यानंतर कोणता निर्णय घेतला हे ही पाहूयात...
वेब सिरीजमधून नावारुपास आलेल्या एका 31 वर्षीय अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिला आलेल्या धक्कादायक अनुभवाबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. मनोरंजनसृष्टीमध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपल्यासोबत फारच विचित्र प्रकार घडला होता असं सांगितलं आहे.
ज्या अभिनेत्रीने हा अनुभव सांगितला आहे तिचं नाव आहे, शालिनी पांड्ये! एका दाक्षिणात्य दिग्दर्शक माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये दरवाजा न वाजवताच शिरला होता असं तिने सांगितलं. ज्यावेळेस हा दिग्दर्शक व्हॅनिटीमध्ये शिरला तेव्हा शालिनी कपडे बदलत होती.
हा सारा प्रकार माझ्यासाठी फारच धक्कादायक होता. या प्रकाराने आपल्याला करिअरच्या सुरुवातीलाच काही सीमा आखून घेतल्या पाहिजेत याची जाणीव करुन दिली आणि त्यानंतर आपण त्याप्रमाणेच एक मर्यादा कायम ठेवली आहे, असं शालिनी म्हणाली.
शालिनीने 'फिल्मीग्यान'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला या दिग्दर्शकाबरोबर आलेल्या अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे. "इथं काम करताना मला केवळ सगळी चांगलीच माणसं भेटली आहेत असं नाही. मी ऑन आणि ऑफ स्क्रीन काही भयंकर व्यक्तींनाही भेटली आहे. यामध्ये अगदी क्रू मेंबर्सचाही समाचार आहे. त्यामुळेच तुम्हाला मर्यादा आखून घेण्याची गरज आहे. मी एक अत्यंत भयंकर व्यक्तीला भेटले होते आणि हे सत्य आहे," असं शालिनी म्हणाली.
मनोरंजन क्षेत्रामध्ये घरचं कोणीही नसल्याने म्हणजेच या क्षेत्रातील आऊटसायडर असल्याने आपल्याला अशा परिस्थितीमध्ये मार्गदर्शन करणारं आणि सांगणारं कोणीही नव्हतं असंही शालिनी म्हणाली. "माझ्या कुटुंबाचं काहीही फिल्मी कनेक्शन नाही. त्यामुळे मी अगदी शून्यातून सुरुवात केली. वाईट गोष्टींचा सामना कसा करायचा याची मला काहीच कल्पना नव्हती," असं शालिनी म्हणाली.
"मी एकटीच या क्षेत्रात झटत होते. संघर्ष करत होते. मला सल्ला द्यायलाही कोणी नव्हतं. मात्र आज मागे वळून पाहिल्यानंतर मला एक बरं वाटतं की मी त्या स्थितीमध्ये होते. कारण त्या परिस्थितीने मला बरंच काही शिकवलं. मी काही ठराविक मर्यादा घालून दिलेल्या. त्याचा मला फायदाच झाला," असं शालिनी म्हणाली.
"माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच एका दाक्षिणात्य चित्रपटात काम करत असताना एकदा चित्रपटाचा दिग्दर्शक माझ्या व्हॅनिटीच्या दारावर नॉक न करताच आत आला. त्यावेळेस मी कपडे बदलत होते. तेव्हा मी या क्षेत्रात फार नवखी होते. तेव्हा लोक तुम्हाला सर्वांशी चांगलं राहायचं, कोणाला अपसेट करायचं नाही असं सांगायचे. तसं केलं तर तुम्हाला काम मिळणार नाही, हे सारं मी ऐकलेलं," असं शालिनीने म्हटलं.
मात्र स्वत:च्या सुरक्षेच्या दृष्टीने शालिनीने त्यावेळी तिच्या पद्धतीने विरोध केलाच. "मी त्यावेळी कसलाही विचार केला नाही. मी जोरात ओरडले. माझा संयम सुटला. मी त्यावेळी 22 वर्षांची होते. त्यानंतर लोकांनी मला तू असं वागायला नको होतं. मात्र त्यावेळी मॅनर्सचं काय? असा माझा सवाल होता," असं शालिनी आपली त्यावेळीची भूमिका मांडताना मुलाखतीत बोलली.
"मी नवीन आहे म्हणून दरवाजा न वाजवताच आत शिरायचं याला काही अर्थ आहे का. त्या गोष्टीने मला बदललं. मीच स्वत:चं रक्षण केलं पाहिजे हे मला जाणवलं. मग हे करताना लोकांना अगदी मला माज आहे असं वाटलं तरी हरकत नाही," असं शालिनी म्हणाली.
"नंतर मी या गोष्टी कशा हाताळायच्या हे शिकले. त्या क्षणी व्यक्त न होता अशा वेळी काय करावं हे मला आता कळतं," असंही शालिनी सांगायला विसरली नाही. शालिनी महाराजामध्ये जुनैद खानसोबत झळकली होती. तसेच तिने 'नेटफ्लिक्स'च्या डब्बा कार्टेल या सिरीजमध्येही काम केलं आहे. आता ती धानुष सोबत 'इडली कढाई'मध्ये झळकणार आहे. (सर्व फोटो - इन्स्टाग्रामवरुन साभार)