Zaheer Khan New House : मुंबई स्वतःच घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. मुंबई हे बॉलिवूड आणि क्रिकेटचं माहेरघर असल्याने इथे अनेक प्रसिद्ध कलाकार आणि खेळाडूंची घर आहेत. यात आता भारताचा माजी क्रिकेटर जहीर खानची सुद्धा भर पडली असून माजी गोलंदाजाने मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे.
भारताचा दिग्गज गोलंदाज जहीर खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर अली आहे. जहीरने त्याची पत्नी सागरिका घाटगे आणि तिचा भाऊ शिवजीत घाटगे यांच्यासोबत मुंबईच्या लोअर परेल भागात 2,600 स्क्वेअर फूटचा आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे.
जहीर खानने भारतासाठी तब्बल 92 टेस्ट आणि 200 वनडे सामने खेळले आहेत. याशिवाय 17 टी 20 सामने खेळले असून 100 आयपीएल सामने सुद्धा खेळले आहेत. जहीर खानने 92 टेस्ट सामन्यांमध्ये 311 विकेट्स घेतल्या तर 200 वनडेत त्याला 282 विकेट्स घेण्यात यश आले.
स्क्वायर यार्ड्सच्या सांगण्यानुसार जहीर खानने खरेदी केलेल्या या अपार्टमेंटची किंमत तब्बल 11 कोटी इतकी आहे. रियल एस्टेट सल्लागार असलेल्या स्क्वायर यार्ड्सने माहिती दिली की, "जहीर खानने प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रांची तपासणी केली. या घराचा खरेदी व्यवहार फेब्रुवारी 2025 मध्ये रजिस्टर्ड करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार सदर मालमत्ता ही इंडियाबुल्स स्कायमध्ये आहे ज्याला इक्विनॉक्स इंडिया डेवलपमेंट लिमिटेड द्वारे विकसित करण्यात आले. अपार्टमेंटचा कार्पेट एरिया हा 2,158 वर्ग फुट असून त्याचा बिल्ड एरिया 2,590 वर्ग फुट इतका आहे. तसेच याला तीन कार पार्किंग देण्यात आले आहेत.
जहीरने केलेला या व्यवहारात 66 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी फी भरलेली असून 30,000 रुपये नोंदणी फी समाविष्ट आहे. रेराच्यानुसार इंडियाबुल्स स्काई ही इमारत 3 एकरांमध्ये पसरलेली असून यातील घर ‘रेडी-टू-मूव-इन’ आहेत. या प्रकल्पातील पुनर्विक्री मालमत्तेची सरासरी किंमत सध्या 49,096 रुपये प्रति चौरस फूट आहे.
जहीर खानने 15 ऑक्टोबर 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. जहीर खानचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर हे जवळपास 14 वर्षांचं होतं. नोव्हेंबर 2017 मध्ये त्याने अभिनेत्री सागरिका घाटगे सोबत विवाह केला.
लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे ही राजघराण्यातली असून धर्माने हिंदू आहे. तर जहीर खान हा मुस्लिम धर्माचा आहे. त्यामुळे या दोघांच्या विवाहाची खूप चर्चा झाली होती. मात्र जहीर सोबत विवाह करूनही सागरिकाने धर्म बदलला नाही, बऱ्याचदा दोघी एकमेकांचे धार्मिक सण उत्साहात साजरे करताना दिसतात.