CM Eknath Shinde Host Special Guests At Varsha Bungalow: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हे खास पाहुणे शुक्रवारी रात्री म्हणजेच 13 सप्टेंबरच्या रात्री आले होते. या भेटीचे फोटो आणि त्यादरम्यान काय काय घडलं हे मुख्यमंत्र्यांनीच थेट फोटो शेअर करत सांगितलं आहे. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री पाहूयात...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे हे फोटो आणि त्यांची कृती सध्या चर्चेचा विषय ठरतेय. नक्की हे पाहुणे कोण होते आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना का हे खास गिफ्ट दिलं जाणून घ्या...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी शुक्रवारी (13 सप्टेंबर 2024 रोजी) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या 'आधारतीर्थ' या आश्रमशाळेतील मुलांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्रीसुद्धा आरतीमध्ये सहभागी झाले. त्यांनीच या भेटीतील फोटो आणि या मुलांनी दिलेल्या खास गिफ्टची माहिती दिली आहे.
वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची या चिमुकल्यांनी मोठ्या भक्तिभावाने आरती केली, असं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.
ढोल ताशांच्या गजरात आपल्या मनातील दुःख वेदना काही काळ बाजूला ठेवून या चिमुकल्यांनी श्री गणरायाची आळवणी केली.
यानंतर या मुलांसाठी खास मेजवानीची सोय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी करण्यात आली होती.
स्वत: मुख्यमंत्र्यांनी या मुलांना जेवायला वाढलं.
आधी काहीशा बुजलेल्या मुलांशी मी आस्थेवाईकपणे संवाद साधला. तसेच त्यांना वडिलांच्या मायेने आग्रह करून जेवू घातले, असं मुख्यमंत्री शिंदेंनी फोटो शेअर करत म्हटलं आहे.
या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांना समजले की त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमशाळेत राहणाऱ्या या मुलांना शाळेत जाण्यासाठी दररोज तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते.
या मुलांची अडचण कायमची सोडवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी तात्काळ यंत्रणा कामाला लावली आणि तातडीने त्यांना दोन स्कुल बस देण्याचा निर्णय घेतला.
यातील पहिली स्कुल बस ही मुलं वर्षा बंगल्यावर असतानाच आणून आधारतीर्थ आश्रमशाळेचे संचालक महंत श्री श्रीरूपानंद स्वामीजींच्या हाती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.
वर्षा बंगल्यावर या बसच्या चाव्या संस्थेच्या ताब्यात देण्यात आल्या. यावेळी मुलांनी खास मारुतीस्तोत्र म्हणून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
तसेच आश्रमशाळेला भेडसावणाऱ्या इतर अडचणी सोडवण्याची तजवीजही मुख्यमंत्र्यांनी केली. सकाळी वर्षावर आलेली ही मुले परत जाताना गाडीत बसून त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, माजी खासदार हेमंत पाटील त्यांच्या पत्नी राजश्री पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार हेमंत पाटील, आमदार किशोर अप्पा पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बाजीराव चव्हाण देखील उपस्थित होते.