Happy Birthday Abhijeet Sawant : एकेकाळी पत्र्याच्या शेडमध्ये राहत असलेला प्रसिद्ध गायक अभिजीत सावंत आज कोट्यवधींचा मालक बनला आहे.
अभिजीतच्या बिग बॉसच्या प्रवासादरम्यान प्रेक्षकांनी त्याला भरभरून पाठिंबा दिला. त्यामुळे अभिजीत या सीझनचा उपविजेता ठरला. पण अभिजीतचा आज पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
अभिजीत सावंत एकेकाळी आपल्या मावशी सोबत पत्र्याच्या झोपडीत राहत होता. तो 'इंडियन आयडॉल 1' चा पहिला विजेता ठरला. पण त्यानंतरही त्याला इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करावा लागला. तो अनेक दिवसांपासून प्रसिद्धीपासून लांब होता. पण बिग बॉस मराठी सीझन 5 मधून त्याने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं.
2004 मध्ये अभिजीत सावंतने देशातील पहिला इंडियन आयडॉल शो जिंकला होता. अभिजीतने आपल्या आवाजाने संपूर्ण देशाला वेड लावले. त्यावेळीही प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. पहिला इंडियन आयडॉल शो जिंकल्यानंतर अभिजीतने 2005 मध्ये आपला पहिला अल्बम काढला. ज्याचे नाव 'आपका अभिजीत सावंत' असे होते. त्यानंतर 2007 मध्ये दोन वर्षांनंतर अभिजीतने 'जूनून' नावाचा आपला दुसरा अल्बम प्रदर्शित केला.
आपल्या करिअरच्या काळात अभिजीत सावंतने अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली. तीस मार खान, आशिक बनाया आपने, ढिशूम आणि इश्कवाला लव्ह अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याची गाणी आहेत. एवढंच नाही तर तीस मार खान आणि लॉटरी या चित्रपटांमध्ये तो मोठ्या पडद्यावर झळकला.
अभिजीत सावंतने एका मुलाखतीत सांगितलं की, त्याच्या एकूण उत्पन्नाच्या 70 टक्के कमाई गाण्यांमधून होते. लाइव्ह स्टेज शो हे त्याच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे. याशिवाय त्याला त्याच्या गाण्यांमधून आणि आधीच्या अल्बममधूनही रॉयल्टी मिळते.
नुकत्याच झालेल्या बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये अभिजीत सावंत झळकला. त्याने या सीझनचे उपविजेते पदही पटकावले. या शोचा तो विजेता ठरला नसला तरी तो 14 आठवडे या शोमध्ये टिकून होता.
बिग बॉस मराठीसाठी अभिजीत दर आठवड्याला जवळपास 3 ते 4 लाख रूपये फी घेत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिजीत सावंत सध्याच्या घडीला जवळपास 2 ते 8 कोटी संपत्तीचा मालक आहे.