Why We Celebrate Independence Day On 15 August: भारताचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट रोजीच का साजरा केला जातो? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? म्हणजे 18 किंवा 20 किंवा 26 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन का साजरा होत नाही? असा प्रश्न तुम्हालाही कधी पडला असेल तर 15 ऑगस्टची तारीख निवडण्यामागे एक खास कारण आहे. 15 ऑगस्ट हाच दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून का साजरा होतो जाणून घेऊयात...
15 ऑगस्टलाच का स्वातंत्र्य दिन साजरा करतात यामागील इतिहास तुम्हाला ठाऊक आहे का? यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जाणून घेऊयात या तारखेचा निवड भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून का करण्यात आला...
भारत 15 ऑगस्ट 2024 ला 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. भारताला याच दिवशी 1947 साली स्वातंत्र्य मिळालं होतं. पंडित जवाहरलाल नेहरु भारताचे पहिलं पंतप्रधान झाले. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहामध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान याच दिवशी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करतात.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये जहाल आणि मवाळ गटाच्या अनेक नेत्यांनी भरीव योगदान दिलं. नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद या सारख्या क्रांतीकारांनी जहाल मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून संघर्ष केला.
तर दुसरीकडे महात्मा गांधींबरोबरच अन्य अनेक नेत्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने स्वातंत्र्याचा लढा उभा केला. आपल्या देशातून ब्रिटीशांना हद्दपार करुन आपल्या देशातील राजकीय कारभाराबरोबरच सर्व निर्णय आपणच घेतले पाहिजे. आपला देशा पारतंत्र्यातून बाहेर आला पाहिजे यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा दिला.
स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये अनेकदा रक्तरंजित संघर्षही झाला. एकीकडे राजकीय दबाव निर्माण करुन, असहकार चळवळ आणि इतर माध्यमातून आंदोलन सुरु असताना अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुतीही दिली. भविष्यातील आपल्या पिढ्या स्वतंत्र देशात असाव्यात यासाठी सर्वजण अगदी प्राणपणाने लढले. या कठोर संघर्षानंतरच देशाला स्वातंत्र्य मिळालं.
काँग्रेस आणि ब्रिटीशांमध्ये भारताच्या हाती कारभार कसा सोपवावा यासाठी बरीच चर्चा झाली. अनेक वर्ष यासंदर्भातील वाटाघाटी सुरु झाल्या. अखेर 4 जुलै 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यासंदर्भात फार महत्त्वाचा निर्णय झाला. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या एक महिना आधी ब्रिटीशांनी स्वतंत्र भारतासंदर्भात एक विधेयक सादर केलं.
ब्रिटीश संसदेमध्ये हे विधेयक सादर करण्यात आल्यानंतर ज्या दिवशी हे विधेयक मांडण्यात आलं त्यानंतर म्हणजेच 4 जुलैनंतर पुढील 15 दिवसांमध्ये हे विधेयक ब्रिटीश संसदेमध्ये संमत करण्यात आलं.
ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासंदर्भात मान्य केलेल्या या विधेयकात असं नमूद करण्यात आसलं होतं की, भारताला स्वतंत्र राज्य म्हणून 15 ऑगस्ट 1947 पासून मान्यता मिळेल. याच तारखेपासून ब्रिटिश शासनाचा भारतामधील कार्यकाळ समाप्त होईल.
काँग्रेसचे प्रमुख नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीमधील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तिरंगा फडकवला. नेहरुंनी संपूर्ण जग झोपेत असताना भारत नव्याने जन्म घेत आहे असं म्हणत दिलेलं भाषण चांगलेच गाजले होते.
याच कारणामुळे ऑगस्टच्या इतर कोणत्याही दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा न करता 15 ऑगस्ट रोजीच स्वातंत्र दिन साजरा केला जातो.