Marathi Accorded Status of Classical Language :केंद्र शासनाच्या या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आलं. किंबहुना अभिजात दर्जा मिळणं म्हणे नेमकं काय होणार, याचीही माहिती समोर आली. पण, ही मराठी भाषा, तिला मिळालेलं हे नाव आणि तिचं वय याविषयीची माहिती आहे का तुला?
Marathi Accorded Status of Classical Language : अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषेविषयीची बरीच माहिती आजवर समोर आलीय. अशा या मुळातच गोडवा असणाऱ्या भाषेला तिचं नाव कसं मिळालं, हा प्रवास नेमका कसा होता माहितीये?
आठव्या शतकाच्या अखेरीस लिहिल्या गेलेल्या 'कुवलयमाला कथा' नावाच्या ग्रंथामध्ये साधारण 18 देशी भाषांचा उल्लेख करण्यात आला होता अशा नोंदीही आढळतात.
याच भाषांमध्ये एक उल्लेख होता तो म्हणजे 'मरहट्ट' नावाच्या भाषेचा. मरहट्ट जनसमुदाय आणि त्यांच्या वापरात असणाऱ्या भाषेच्या वर्णनासाठी 'दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कळहसीले य| दिण्णले गहिल्ले उल्लाविरे तत्थ मरहट्टे' असं तिथं लिहिल्याचे संदर्भ आहेत.
हा झाला मराठी भाषेचा पहिला संदर्भ. मराठी भाषेच्या उदयाची पाळंमुळं इसवीसन 859 पासूनची आहेत. जिथं 'धर्मोपदेशमाला' या ग्रंथामध्येसुद्धा 'मरहट्ट' भाषेचा उल्लेख आढळतो.
वरील उल्लेखांमुळं मराठी भाषेला प्राचीन काळात 'मरहट्ट' म्हटलं जातं असं सिद्ध होतं. थोडक्यात मराठी भाषेचं वय सांगितलं जातं साधारण 2400 वर्षे. मराठी भाषेच्या नावाचा उल्लेख यादवकालीन साहित्यामध्येही आढळतो, जिथं या भाषेसाठी 'मऱ्हाटी' असा शब्द वापरला गेल्याचं सांगितलं जातं.
मऱ्हाटीसोबतच त्या काळात ही भाषा 'देशी' म्हणूनही ओळखली जात होती. महानुभव पंथांचे ग्रंथ आणि ज्ञानेश्वरीमध्ये मराठीचा उल्लेख काहीसा असाच असल्याचं पाहायला मिळतं. काहींचं म्हणणं असं आहे की, मराठी हा शब्द महाराष्ट्र या शब्दाच्या अपभ्रंशातुनही आला. मध्यप्रदेशातील एरण येथे सुमारे इ.स. चौथ्या शतकातील एक शिलालेख सापडला होता. जिथं सर्वप्रथम 'महाराष्ट्र' या नावाचा उल्लेख आढळला होता.
शक राजा श्रीधरवर्मा याचा सेनापती सत्यनाग याने युद्धात मरण पावलेल्या नाग लोकांच्या स्मरणार्थ हा शिलालेख उभारला होता. लेखात सत्यनाग याने तो 'माहाराष्ट्र' म्हणजे महाराष्ट्रचा रहिवासी असल्याचं सांगितलं होतं. ज्यामुळं प्राचीन महाराष्ट्रात नाग लोकांची वस्ती होती असंही म्हटलं जातं.