दिवाळी जवळ येऊ लागल्यानं घरोघरी फराळाचे पदार्थ बनवायला सुरुवात झाली असेल. सध्या अनेकजण आरोग्याबाबत सजगता दाखवून गोड पदार्थ बनवण्यासाठी साखरे ऐवजी गुळाचा वापर करतात. पण सणासुदीच्या दिवसात बाजारात भेसळयुक्त पदार्थ सुद्धा विक्रीसाठी येतात. असे भेसळयुक्त पदार्थ वापरल्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. तेव्हा भेसळयुक्त गूळ कसा ओळखायचा याच्या काही टिप्स जाणून घेऊयात.
गुळाची चव तपासून तुम्ही गूळ शुद्ध आहे की बनावट हे ओळखू शकता. गूळ खरेदी करताना त्याचा थोडासा तुकडा काढून त्याची चव चाखा. जर गुळाची चव ही कडू किंवा खारट असेल तर असा गूळ बनावट असतो. शुद्ध गुळाची चव ही नेहमी गोड असते.
बाजारात मिळणाऱ्या गुळाचा रंग हा डार्क ब्राऊन, लाईट ब्राऊन किंवा पिवळट असा असतो. त्यापैकी डार्क ब्राऊन रंगाचा गूळ पूर्णपणे शुद्ध असतो. तर फिक्या पिवळट रंगाच्या गुळात केमिकल वापरलेले असण्याची शक्यता असते. म्हणून गूळ खरेदी करताना डार्क ब्राऊन रंगाचा गूळ घेणं कधीही चांगलं.
तुम्ही बनावट गूळ ओळखण्यासाठी वॉटर टेस्ट सुद्धा करू शकता. बनावट गुळाला गॉड बनवण्यासाठी त्यात शुगर क्रिस्टल वापरले जातात. अशा स्थितीत नकली गूळ पाण्यात टाकल्यास तो भांड्याच्या तळाशी जातो त्याउलट शुद्ध गूळ मात्र वजन कमी असल्याने पाण्यात तरंगतो आणि लवकर विरघळतो.
गुळामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. त्यात सोलेनियम, लोह, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे गुणधर्म आढळतात. हिवाळ्यात गुळाच्या सेवनाने शरीरात उष्णता निर्माण होते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)