Weather Update : तुमच्या ओळखीतील कोणी या भागात जाणार असल्यास आधीच सावध करा. कारण वातावरणात होणार आहेर अनपेक्षित, रौद्र बदल... कुठे देण्यात आले हाहाकाराचे संकेत?
Weather Update : पर्यटकांच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या आणि सध्याच्या काळात चारधाम यात्रेमुळं परराज्यातील अनेकांचीच गर्दी झालेल्या उत्तराखंड राज्यासाठी केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
4 ऑगस्ट आणि पुढील काही तास या राज्यात हवामानात काही अनपेक्षित आणि तितकेच धडकी भरवणारे बदल होणार असल्याचा इशारा देत परिस्थिती बिघडणार असल्याचा इशारा आयएमडीनं दिला आहे.
उत्तराखंडमधील अनेक राज्यांसाठी आयएमडीनं ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील 48 तासांसाठी नागरिकांसह यंत्रणांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तराखंडमधील नैनीताल,पिथौरागढ़,अल्मोड़ा, उधमसिंह नगर, चमोली आणि बागेश्वर इथं पावसाचं प्रमाण वाढणार असून अनेक भागांमध्ये भूस्खलनाचा धोकासुद्धा असल्याचं सांगण्यात आलं आहे. देहरादूनमधील हवामान केंद्राच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या नैनीताल आणि बागेश्वरसह चंपावत जिल्ह्याला पाऊस झोडपणार आहे.
पावसाचे एकंदर तालरंग पाहता या भागातील शिशुवर्गापासून ते माध्यमिक वर्गांपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या असून, गरज भासल्यास महाविद्यालयांनाही रजा जाहीर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
उत्तराखंडमधील देहरादून, हरिद्वार, अल्मोड़ा,रुद्रप्रयाग, चमोली, उत्तरकाशी, पिथौरागढ़, ऊधमसिंहनगर, पौड़ी आणि टिहरी जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला असून, तिथं मेघगर्जनेसह पावसाची हजेरी असेल असं सांगितलं आहे.
ऋषीकेशमध्ये गंगा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी झपाट्यानं वाढत असल्या कारणानं नागरिकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव दक्षता म्हणून स्थलांतरित होण्याचा इशारासुद्धा जारी करण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला या राज्यात 64 रस्ते पूर्णपणे बंद असून, यामध्ये 52 ग्रामीण रस्त्यांचाही समावेश आहे. वाहतुकीवर परिणाम झाल्यानं या राज्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालं आहे.