Indian Railway Food : प्रत्येक प्रवाशाचं भारतीय रेल्वेशी एक खास नातं असून, रेल्वेचा हा प्रवास असो, रेल्वेगाड्यांचे प्रकार असो किंवा ठराविक अंतरानं बदलणारी भौगोलिक स्थिती असो... प्रवास खास असतो हे खरं.
रेल्वेनं होणाऱ्या या प्रवासाच खरी लज्जत आणतं ते म्हणजे रेल्वेच्या वतीनं प्रवाशांना दिलं जाणारं जेवण, चहा, नाश्ता आणि बरंच काही. रेल्वेतील ही सेवा IRCTC कडून चालवली जाते. त्यातही कोणत्या पदार्थांना विशेष मागणी असते याचा अंदाज आहे का?
रेल्वेमध्ये सहसा सकाळी नाश्त्याला व्हेज कटलेट आणि ब्रेड दिलं जातं. हे कटलेट अनेकांच्याच पसंतीचं. अगदी उत्तर भारतापासून दक्षिणेपर्यंत कटलेट फारच लोकप्रिय. तर, मांसाहारींसाठी ब्रेड ऑम्लेट हा चवीष्ट पर्याय उपलब्ध असतो. सोबतीला केचअपही दिलं जातं.
IRCTC कडून अनेकदा उत्तर भारतातील रेल्वेंमध्ये नाश्त्याला पराठेसुद्धा असतात. यामध्ये सोबतीला दही आणि लोणचं दिलं जातं.
रात्रीच्या जेवणाआधी प्रवाशांना गरमागरम टोमॅटो सूप दिलं जातं. टोमॅटो प्युरी, मीठ, काळिमिरीपूड, सोबतीला बटर, सूप स्टीक्ससुद्धा दिल्या जातात.
रेल्वेमध्ये शाकाहारींसाठी कढाही पनीर, डाल मखनी किंवा दाल तडका हे पदार्थ अनेकांच्याच आवडीचे. कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही आणि काही मसाल्यांमुळं या पदार्थांची चव वाढते.
कॅरेमल पॉपकॉर्न, सोनपापडी, गुलाबजाम इतकंच काय तर, आईस्क्रीमसुद्धा वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांमध्ये गोडाचा पदार्थ म्हणून दिलं जातं.
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना समोसा, कचोरी, चहा, दूध, कॉफी, लस्सी अशी पेय आणि नमकीनही दिले जात प्रवाशांच्या जीभेचे चोचले पुरवले जातात.
अनेकांना रेल्वेत मिळणारी चिकन ग्रेव्हीसुद्धा कमालीची आवडते. वरील पदार्थांना देशभरातील नागरिकांकडून मिळणारी पसंती पाहता IRCTC नं रेल्वेच्या मेन्यूमध्ये त्यांचा समावेश केला आहे. शिवाय हे पदार्थ दीर्घ काळासाठी खराब होणार नाहीत अशाच पद्धतीनं तयार करण्याकडे IRCTC चा भर असतो.