Indian Railways Vande Bharat Updates: महाराष्ट्रामध्ये एकूण 22 मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावते. मात्र त्यापैकी एका मार्गावर या ट्रेनला 133 टक्के प्रतिसाद मिळतोय. हा मार्ग कोणता, इथं तिकीट किती आणि रेल्वेनं नवा काय निर्णय घेतलाय जाणून घेऊयात...
महाराष्ट्राच नाही तर देशातील सर्वाधिक प्रतिसाद मिळणारी वंदे भारत महाराष्ट्रातून धावते. याच मार्गसंदर्भात आता रेल्वेनं एक मोठा निर्णय घेतला असून त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. हा मार्ग कोणता, रेल्वेनं काय निर्णय घेतलाय आणि त्याचा काय परिणाम होणार जाणून घेऊयात...
देशातील अनेक राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन चालवली जात आहे. रेल्वेमंत्री अश्वीन वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 144 वंदे भारत चालवल्या जात आहेत. महाराष्ट्रातही सध्या 22 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात. अनेक महत्त्वाची धार्मिक स्थळं आणि शहरे वंदे भारतच्या माध्यमातून जोडली गेली आहेत.
महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई, पुणे आणि नागपूर ही तीन अत्यंत महत्त्वाची शहरं या सेमी-फास्ट ट्रेनने जोडण्यात आली आहेत. मात्र यापैकी एका मार्गावर वंदे भारतला एवढा प्रतिसाद मिळत आहे की प्रवाशांचा प्रतिसाद पाहून राज्यात पहिल्यांदाच 20 डब्ब्यांची वंदे भारत चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
महाराष्ट्रात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन्समध्ये थेट मुंबई ते पुण्यादरम्यान वेगळी वंदे भारत ट्रेन चावली जात नाही. या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या अनेक ट्रेन्स उपलब्ध असल्याने या मार्गावर वेगळी वंदे भारत धावत नसली तरी या मार्गावरुन एक वंदे भारत जाते.
विशेष म्हणजे याच वंदे भारतला केवळ मुंबई-पुण्यादरम्यान प्रवास करण्यासाठी प्रचंड मागणी असल्याचं दिसून येत आहे. या मार्गावरील वंदे भारतला मुंबई-पुण्यादरम्यानच्या बुकींगला तब्बल 133 टक्के प्रतिसाद असल्याचं समोर आलं आहे. हा प्रतिसाद पाहूनच आता रेल्वेने या मार्गावरील वंदे भारतचे डब्बे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या मार्गाबद्दल आपण बोलतोय तो मार्ग आहे, मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचा! या वंदे भारत ट्रेनमधील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या गाडीला चार अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या असलेल्या मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला असलेल्या 16 डब्यांऐवजी आता 20 डब्यांचा रेक वापरण्यात येणार आहे. 29 ऑगस्टपासून हा बदल लागू केला जाणार असल्याचं रेल्वेने स्पष्ट केलं आहे.
डब्ब्यांची संख्या चारने वाढल्याने एकूण 312 प्रवाशांसाठी अतिरिक्तच आसन व्यवस्था उपलब्ध होणार आहे. म्हणूनच डबे वाढवणे ही प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला जोडण्यात येणारे डब्बे हे चेअर कार डब्बे असतील. मुंबई ते पुणेदरम्यानचं या वंदे भारत एक्सप्रेसचं चेअर क्लासचं तिकीट 700 रुपये इतकं आहे.
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईवरुन दुपारी चार वाजता निघते आणि पुण्यात सायंकाळी सात वाजेपर्यंत पोहोचते. एकीकडे रस्ते मार्गाने वाहतुककोंडी आणि इतर गोष्टींचा विचार करता सहा तास लागतात तर त्या तुलनेत या ट्रेनने अर्धाच वेळ लागतो.
सोलापूरवरुन सकाळी सहा वाजता निघणारी सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी सव्वा नऊच्या आसपास पुण्यात पोहोचते. दुपारी 12 पर्यंत ही ट्रेन प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सोडते. त्यामुळे या ट्रेनचा प्रवास हा अधिक सुखकर आणि आरामदायक असल्याने तिला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य पीटीआय आणि रॉयटर्स)