New Rules Of IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम अधिक चुरशीचा आणि रंगतदार होणार आहे. आयपीएलच्या (IPL 2023) या हंगामात नवे पाच नियम (New Rules) पाहायला मिळणार आहे. या नियमांमुळे सामन्याचा निकालही बदलू शकतो. या नियमांमुळे आयपीएलला नवी ओळख मिळणार आहे. जाणून घेऊया यंदाच्या आयपीएलमधले हे पाच नियम कोणते आहेत.
यंदाचा आयपीएलमध्ये सर्वात मोठा नियम म्हणजे सामन्याचा टॉस (Toss) उडल्यानंतरही प्रत्येक संघाला आपल्या अंतिम अकरा खेळाडूंच्या (Playing XI) यादीत बदल करता येणार आहे. याआधी टॉस उडवण्याआधी प्रत्येक संघाला आपल्या प्लेईंग इलेव्हनची यादी अंपायर्सला द्यावी लागत होती. आता प्लेईंग इलेव्हनच्या यादीत पाच अतिरिक्त खेळाडूंची नावं द्यावी लागणार आहेत.
आयपीएलची स्पर्धा हंगाम निष्पक्ष होण्यासाठी यंदा वाईड आणि नो बॉलवरही खेळाडूला डीआरएस (DRS) घेता येणार आहे. याआधी खेळाडू आऊट किंवा नॉटआऊट दिल्यावर डीआरएस घेतला जात होता. पण आता अंपायर्सने वाइड किंवा नो-बॉल दिल्यावरही डीआरएस घेता येणार आहे. अंपायर्सने वाईड किंवा नो-बॉल दिल्याने याआधी अनेकवेळा वाद निर्माण झाले आहेत. हे वाद डीआरएसमुळे मिटण्यास मदत होणार आहे.
आयपीएल 2023 मध्ये इम्पॅक्ट प्लेअरच्या (Impact Players) नियमामुळे सामना अधिक रंगतदार होणार आहे. संघाच्या कर्णधाराला प्लेइंग इलेव्हनबरोबर पाच सब्सिट्यूट खेळाडूंची नावंही द्यावी लागणार आहे. सामन्यातील 14 षटकं संपण्याआधी पाच सबस्टीट्यूट (Substitute) खेळाडूंपैकी एका खेळाडूला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून संघात घेता येणार आहेत. सबस्टीटयूट खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजीही करु शकणार आहे. पण पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सामना 10 ओव्हरचा खेळवण्यात आल्यास इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू होणार नाही.
IPL 2023 मध्ये सामन्यादरम्यान संघातील विकेटकीपर किंवा क्षेत्ररक्षकाने अचानक फिल्डिंग पोझिशन (Fielding Position) बदलली तर तो चेंडू डेड घोषित केला जाईल. इतकंच नाही तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात पाच पेनल्टी धावा दिल्या जाणार आहेत.
स्पर्धेतल्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने सुरुवातीला निर्धारित वेळेत ओव्हर्स (Slow Over Rate) पूर्ण केल्या नाहीत तर संघाला दंड आकारला जाणार आहे. म्हणजे पुढच्या ओव्हर्सदरम्यान 30 यार्डाच्या बाहेर केवळ चार क्षेत्ररक्षक ठेवता येणार आहेत.