IPL 2023 : भारतीय संघ म्हणू नका किंवा मग आयपीएलची टीम. सिराजनं कायमच त्याच्या खेळाच्या बळावर या क्षेत्रात आपली वाट बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
अशा या खेळाडूच्या आयुष्यातील काही खास क्षण नुकतेच सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी पाहिले. कुटुंबाच्या अतिशय जवळ असणाऱ्या सिराजच्या घरी काही खास पाहुणे आले आणि हेच क्षण अनेकांना भारावून गेले.
मोहम्मद सिराजच्या घरी आलेले हे पाहुणे म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघातील खेळाडू. सनरायजर्स हैदराबादविरोधातील (SRH) सामन्यापूर्वी आरसीबीच्या (RCB) खेळाडूंनी सिराजचं घर गाठलं.
प्रचंड मेहनत आणि चिकाटीनं स्वप्नांचा पाठलाग करत सिराजनं हा स्वप्नांचा डोलारा उभा केला आणि क्रिकेट जगतातील बड्या खेळाडूंनी या वास्तूला भेट दिली. याहून मोठी गोष्ट काय ती?
संघातील खेळाडूंसाठी सिराजच्या घरी मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर आरसीबीच्याच वतीनं या क्षणांचे काही फोटो शेअर करण्यात आले.
क्रिकेट क्षेत्रातील इतकी मोठी नावं आपल्या घरी आल्याचा आनंद आणि त्यांच्याप्रती असणारं कुतूहल सिराजच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळालं.
खुद्द मोहम्मद सिराजचाही आनंद या क्षणांना गगनात मावेनासा झाला होता. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासोबतच तो मोठ्या आपुलकीनं सर्वांना कुटुंबीयांसोबत भेटवत होता.
आता या भेटीगाठी झाल्या, मेजवानीवर तावही मारून झाला. आरसीबीचं पुढलं लक्ष्य असेल हैदराबादच्या संघाला नमवण्याचं. (सर्व छायाचित्र- आरसीबी/ ट्विटर)