Vaibhav Suryavanshi IPL 2025 : सोमवारी आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने रेकॉर्ड ब्रेक शतक ठोकले. राजस्थानकडून खेळणाऱ्या या युवा फलंदाजाने केवळ 35 बॉलमध्ये शतक ठोकले आणि तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला. तेव्हा वैभव सूर्यवंशी कोणत्या वर्गात शिकतो? त्याच्या शाळेचं नाव काय याबाबत जाणून घेऊयात.
फक्त 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या आयपीएल 2025 मध्ये दमदार फलंदाजी करत असून गोलंदाजांची धुलाई करतोय. IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने त्यावर 1.10 कोटींची बोली लावून करारबद्ध केले.
वैभव सूर्यवंशीने त्याचा आयपीएल 2025 मधील पदार्पणाचा सामना हा 19 एप्रिल रोजी लखनऊ विरुद्ध खेळला. पहिल्या सामन्यात त्याने 20 बॉलमध्ये 34 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात युवा खेळाडू सुद्धा ठरला.
वैभवच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले होते की वयाच्या 5 व्या वर्षी पासूनच वैभवने क्रिकेट खेळणं सुरु केलं होतं. लहान वयातच तो चांगलं क्रिकेट खेळू लागला त्यामुळे त्याला पुढील ट्रेनिंगसाठी समस्तीपुर, पटेल मैदानमध्ये ब्रिजेश झा यांच्या कॅम्पमध्ये पाठवण्यात आले. तेव्हा तो केवळ 7 वर्षांचा होता.
वैभव सूर्यवंशीचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला असून तो सध्या 14 वर्षांचा आहे. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी सांगितले की वैभव हा ताजपुर बिहार येथील डॉ. मुक्तेश्वर सिन्हा मॉडेस्टी स्कूलमध्ये शिकतो. तो सध्या 8 वी इयत्तेत शिकतोय.
वैभवच्या वडिलांनी सांगितले की सकाळी लवकर उठून तो अभ्यास करतो, पण त्याचं जास्त लक्ष हे क्रिकेटवरच असते. बऱ्याचदा दोन्ही गोष्टी मॅनेज करणं कठीण होऊन जातं. जर आम्ही आमच्या मुलाला सांगितलं की अभ्यासात 95 टक्के गुण आण तर त्याच्यासाठी हे कठीण असेल. त्यामुळे आम्ही त्याच्यावर अभ्यासाबाबत जास्त दबाव टाकत नाही.
वैभव सूर्यवंशीने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुद्धा दमदार कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने दमदार खेळाचं प्रदर्शन केलं होतं.
वैभव सूर्यवंशी हा सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंह धोनी यांना आपला आदर्श मानतो. वैभवचं स्वप्न आहे की त्याला एक दिवस भारतीय क्रिकेट संघात खेळायचं आहे.