भारत - पाक तणावामुळे एक आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आलेली आयपीएल 2025 शनिवार 17 मे पासून पुन्हा एकदा सुरु होणार आहे. यंदाच्या 18 व्या सीजनमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार होते त्यातील आता केवळ 17 सामने शिल्लक आहेत. तेव्हा IPL 2025 चं सुधारित वेळापत्रक कसं आहे आणि तुमच्या आवडत्या संघांचे सामने कधी आहेत याविषयी जाणून घेऊयात.
12 मे रोजी बीसीसीआयने आयपीएल 2025 च्या नव्या वेळापत्रकाची घोषणा केली. यानुसार 6 ठिकाणी आयपीएलचे उर्वरित 17 सामने खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाईल. सुधारित वेळापत्रकात दोन डबल-हेडर सामने समाविष्ट असून ते दोन रविवारी खेळवले जातील.
आयपीएल 2025 चे उर्वरित लीग स्टेज सामने हे मुंबईतील वानखेडे स्टेडियम, जयपूरचं सवाई मानसिंह स्टेडियम, अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम, बंगळुरूमधील चिन्नस्वामी स्टेडियम, लखनऊचं एकना स्टेडियम आणि दिल्लीचं अरुण जेटली स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहेत.
आयपीएल 2025 मध्ये क्वालिफायर 1 सामना 29 मे, एलिमिनेटर सामना 30 मे, क्वालिफायर 2 सामना 1 जून रोजी, तर फायनल सामना 3 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. प्लेऑफ सामन्यांसाठी ठिकाणांची माहिती नंतर जाहीर केली जाणार असल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे.
आतापर्यंत झालेल्या आयपीएल सामन्याचे निकाल पहिले तर पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स +0. 793 नेट रनरेट आणि 16 पॉईंट्स सह पहिल्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ +0. 482 नेट रनरेट दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स आहे. तर चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आहे.
17 मे रोजी आयपीएल 2025 चा 58 वा सामना हा आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यात होईल. 18 मे च्या रविवारी डबल हेडर सामने होणार असून दुपारी पंजाब विरुद्ध राजस्थान तर त्यानंतर दिल्ली विरुद्ध गुजरात यांच्यात सामना होईल.
नव्या वेळापत्रकानुसार मुंबई इंडियन्स बुधवार 21 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामना खेळेल. तर सोमवार 26 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात जयपूरच्या स्टेडियमवर सामना होईल.
आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांनुसार मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने 12 सामन्यात 510 धावांची कामगिरी केली आहे. त्यामुळे सध्या सूर्याकडे ऑरेंज कॅप आहे. तर गुजरात टायटन्सचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने 11 सामन्यात तब्बल 20 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आयपीएल 2025ची पर्पल कॅप प्रसिद्ध कृष्णाकडे आहे.
जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत लीग असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनमध्ये विजेत्या संघाला 20 कोटी रुपये दिले जातील. तर उपविजेत्याला 13 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाईल.