Asia Cup 2023 Jasprit Bumrah Return Home: आशिया चषक स्पर्धेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर आज होणाऱ्या नेपाळविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे. असं असतानाच रविवारी भारताला एक मोठा धक्का बसला. भारतीय गोलंदाजीचा कणा असलेला जसप्रीत बुमराह अचानक दौरा अर्ध्यात सोडून मुंबईतील घरी परतला. मात्र बुमराह अचानक येण्यामागे त्याची पत्नी कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे. जाणून घेऊयात नेमकं घडलं काय...
भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी यंदाचं वर्ष फारच स्पेशल असणार आहे असे संकेत आहेत.
मागील अनेक महिन्यांपासून पाठीच्या दुखण्यामुळे मैदानापासून दूर असलेल्या बुमराहने आयर्लंड दौऱ्यामधून पुनरागमन केलं. विशेष म्हणजे थेट कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी खांद्यावर घेत बुमराहने भारताला मालिका जिंकवून दिली.
आता आशिया चषक स्पर्धेमधील बुमराहच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच अचानक बुमराह दौरा अर्ध्यात सोडून मायदेशी परतला आहे. बुमराह अचानक मायदेशी परतण्यामागे कारण आहे त्याची पत्नी संजना गणेशन.
आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना शनिवारी झाला. मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण खेळवता आला नाही आणि तो अनिर्णित राहिला.
भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना हार्दिक पंड्या आणि इशान किशनच्या फलंदाजीच्या जोरावर 266 धावांपर्यंत मजल मारली. मात्र पाकिस्तानच्या संघाला मैदानात उतरण्याची संधीच पावसाने दिली नाही.
तब्बल 4 वर्षांनी एकदिवसीय सामन्यात आमने-सामने आलेल्या या दोन्ही संघांच्या चाहत्यांना सामन्याचा पूर्ण आनंद घेताच आला नाही. सामन्याचा निकाल न लागल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण वाटून देण्यात आला.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बुमराहला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. मात्र भारताची सलामीच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्याने बुमराहला फलंदाजीची संधी मिळाली. त्याने फलंदाजीमध्ये आपलं योगदान दिलं. शाहीन शाह आफ्रिदीबरोबरच हारिस रौफ आणि नदीमलाही बुमराहने चौकार लगावल्याने भारताचा स्कोअर 266 पर्यंत पोहोचला.
भारताचा दुसरा सामना आज श्रीलंकेतील कॅण्डीच्या मैदानात नेपाळविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वीच बुमराह आपल्या मुंबईतील घरी परतला आहे.
मालिका अर्ध्यात सोडून बुमराह अचानक का परतला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. बीसीसीआयकडूनही 'खासगी कारणासाठी' बुमराह परतला आहे, एवढीच माहिती देण्यात आली.
मात्र बुमराह मुंबईत का परतला हे समजल्यानंतर त्याच्या चाहत्यांबरोबरच सर्वच क्रिकेट चाहत्यांना आनंद होईल अशीच बातमी आहे.
बुमराह आणि संजनाच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. संजना गरोदर आहे. त्यामुळेच याचसंदर्भातील कारणामुळे बुमराह अचानक दौरा अर्ध्यात सोडून मायदेशी परतला.
बुमराह आणि संजना यांनी यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी अनेक प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील बातम्या दिल्या आहेत.
बुमराह पाकिस्तानविरुद्ध सुपर-4 मध्ये 10 सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सामन्याआधी पुन्हा श्रीलंकेत परतणार आहे असंही समजतं.
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन 15 मार्च 2021 रोजी विवाहबंधनात अडकले.
संजना ही स्पोर्ट्स अँकर आहे. एका कार्यक्रमादरम्यानच पहिल्यांदा तिची आणि बुमराहची भेट झाली होती.
लवकरच संजना आणि बुमराह पालक होणार आहेत. हे या दोघांचं पहिलं मुल असेल.