Raj Thackeray On Jitendra Awhad vs Gopichand Padalkar Clash: राज ठाकरेंनी विधानसभेतील हाणामारीसंदर्भात बोलताना अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील लोकांनाही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. तसेच प्रसारमाध्यमांनाही एक सूचक इशारा दिलाय. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये विधानसभेतील हाणामारीवर भाष्य केलं आहे. यावेळेस त्यांनी मनसेच्या आंदोलनाविरुद्ध बोलणाऱ्यांपासून ते अगदी प्रसारमाध्यमांपर्यंत इशारा दिला आहे. तसेच दिवंगत आमदार रमेश वांजळेंनी घातलेल्या गोंधळाचाही संदर्भ दिला आहे. नेमकं राज काय काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रियेतील 10 मुद्दे....
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेच्या मुख्य इमारतीच्या लॉबीमध्ये गुरुवारी, 17 जुलै 2025 रोजी झालेल्या हाणामारीवर कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं आहे. राज यांनी सहा प्रश्न उपस्थित करतानाच अगदी विधानसभेच्या अधिवेशनासाठी होणारा दैनंदिन खर्च, रमेश वांजळेंचा संदर्भ, मराठीसाठी होणारी आंदोलने या साऱ्या गोष्टींचा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केलाय.
राज यांनी विचारलेले प्रश्न प्रत्येक मराठी माणसाला विचार करायला लावणारे आहेत. राज यांनी या विषयावर नोंदवलेल्या प्रतिक्रियेमधील 10 महत्त्वाचे मुद्दे पाहूयात...
"काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?'" असं राज ठाकरेंनी पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे.
"सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो," असं राज ठाकरेंनी म्हटलंय.
"मी तर मराठी जनतेलाच विचारेन, 'कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?'" असा उद्विग्न प्रश्न राज ठाकरेंनी विचारलाय.
"मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत?" असा सवालही राज यांनी विचारला आहे.
"जेव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय?" असा सवाल राज यांनी विचारला आहे. यामध्ये त्यांनी दिलेला संदर्भ हा रमेश वांजळेंनी अबु आझमींसमोरचं पोडियम खेचल्याचा आहे.
"अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे?" असा संतप्त सवाल राज यांनी केला आहे.
"महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत?" असा सवाल राज यांनी विचारला आहे.
"आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही," अशी भीतीही राज यांनी व्यक्त केली आहे.
"माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकारणांमध्ये तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा," असं आवाहन राज यांनी प्रसारमाध्यमांन केलं आहे.
तसेच पोस्टच्या शेवटी इशारा देताना राज ठाकरेंनी, "जर ती कारवाई तुम्हाला (प्रसारमाध्यमांना) करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका," असं म्हटलं आहे. (राज ठाकरेंचे सर्व फोटो - राज ठाकरेंच्या फेसबुकवरुन साभार)