Non Fried Puri Recipe in Marathi: महाराष्ट्रातील घराघरांत आवर्जुन केला जाणारा पदार्थ म्हणजे श्रीखंड-पुरी. प्रत्येक सणाला किंवा घरी खास पाहुणे येणार असतील तर श्रीखंड-पुरीचा बेत आखला जातो. पण हल्ली बदललेली जीवनशैलीमुळं तेलकट पदार्थ खाणे टाळले जाते. पण गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होतोय. तो म्हणजे तेलाचा एक थेंबही न वापरता पाण्यात तळता येणाऱ्या पुऱ्या.
सोशल मीडियावर व्हायल होणाऱ्या व्हिडिओत झिरो ऑइल पुरीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. तेलाचा एक थेंबही न वापरता ही पुरी तयार होते. मात्र, या पुरीचे काही दुष्परिणामदेखील आहेत. आधी ही पुरी कशी करायची ते पाहा
एका भांड्यात 1 कप गव्हाचे पीठ, 1/4 टीस्पून मीट, 1/2 चमचे दही टाकून पुरीसारखे घट्ट कणिक मळून घ्या. त्यानंतर पुरी लाटून घ्या.
गॅसवर एका कढाईत पाणी उकळवत ठेवा. उकळलेल्या पाण्यात पुऱ्या टाकून त्या वर तरंगत नाही तोपर्यंत शिजवा. साधारण 2-3 मिनिटांपर्यंत शिजवून घ्या.
नंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे एअर फ्रायर तीन ते चार मिनिटांसाठी प्री हिट करुन घ्या. 190 अंशावर ठेवा. त्यानंतर एअर फ्रायरमध्ये दोन ते चार पुऱ्या एकत्र ठेवा.
लक्षात घ्या की या पुऱ्या एकावर एक ठेवू नका. 5-6 मिनिटांसाठी या पुऱ्या एअरफ्रायरमध्ये ठेवून शिजवून घ्या. गरम गरम टम्म फुगलेली पुरी तयार होईल
मधुरा रेसिपीज यांनी इन्स्टावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, त्यानुसार, तेल न वापरता केलेली पुरी ही आरोग्यासाठी जरी चांगली असली तरी ही प्रक्रिया खूप वेळखाऊ आहे. तीन ते चार पुऱ्या करण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ जातो. कारण या बेक केलेल्या पुऱ्या आहेत. या वेळात गृहिणींच्या आरामात 30 पुऱ्या तळुन होतात.
शिवाय एअरफ्रायरमधील या पुऱ्या चवीला थोड्या चिवट लागतात. तसंच, जर गरम गरम खाणार असाल तरच या पुऱ्या घरी करुन पाहा. कारण कालांतराने त्या कुरकुरीत होतात व भाजीसोबत तुम्ही त्या खाऊ शकत नाही.