RCB vs PBKS IPL Final 2025 Rules: आयपीएल 2025 चा फायनल सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे. मंगळवार 3 जून रोजी हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्या दरम्यान पावसामुळे अडथळा येण्याची शक्यता आहे. तेव्हा फायनल सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ आली तर कोणता संघ विजेता ठरणार याविषयी जाणून घेऊयात.
क्वालिफायर 1 सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव करून आरसीबी संघाने प्रथम फायनलमध्ये एंट्री घेतली होती. त्यानंतर 1 जून रोजी मुंबई इंडिअन्सचा पराभव करून पंजाब किंग्सने फायनलमध्ये धडक दिली. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. तेव्हा कोणता संघ आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अहमदाबाद येथे रविवारी खेळवण्यात आलेल्या क्वालिफायर 2 सामन्यादरम्यान पावसामुळे अडथळा आला होता. आता ३ जून रोजी होणारी फायनल सुद्धा याच मैदानावर खेळवली जाणार आहे. तेव्हा जर अतिशय बिकट हवामान होऊन पावसामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली तर आयपीएल 2025 चा विजेता ठरवण्यासाठी काही नियम आखण्यात आले आहेत.
भारत - पाक तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. ज्यामुळे 25 मे रोजी होणारी आयपीएल फायनल आता 3 जून रोजी होतं आहे. यापूर्वी आयपीएल फायनल ही कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार होती, मात्र तेथील पावसाची शक्यता पाहता फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असे ठरवण्यात आले, परंतु हवामानाच्या रिपोर्टनुसार फायनलवेळी येथे ही पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
3 जून रोजी आयपीएल 2025 चा फायनल सामना होईल. या दरम्यान पावसामुळे अडथळा आल्यास त्यासाठी अतिरिक्त दोन तास दिले जातील. जर मंगळवारी पावसामुळे सामना खेळवला जाण्याची परिस्थिती नसेल तर 4 तारखेला रिजर्व डे च्या दिवशी सामना खेळवला जाईल.
जर आयपीएल फायनलच्या रिजर्व डे च्या दिवशी सुद्धा पावसामुळे सामना खेळवला गेला नाही तर आयपीएल 2025 च्या लीग स्टेज पॉईंट्स टेबलमध्ये सर्वोच्च स्थानी असणाऱ्या संघाला विजेता म्हणून घोषित केले जाईल.
सध्या आयपीएल 2025 च्या लीग स्टेज पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पंजाब किंग्स, दुसऱ्या क्रमांकावर आरसीबी, तिसऱ्या क्रमांकावर गुजरात टायटन्स आणि चौथ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स आहे. त्यामुळे पावसामुळे एकही बॉलचा सामना खेळवला जाऊ शकला नाही तर नियमांनुसार पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा पंजाब किंग्स संघाला विजेता म्हणून घोषित केले जाईल.
आयपीएल 2025 च्या विजेत्या संघाला आयपीएलची ट्रॉफी आणि 20 कोटींची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. तर उपविजेत्या संघाला 13 कोटींची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल.
आयपीएल फायनल पावसामुळे रद्द करण्यात आली असं आयपीएलच्या इतिहासात अद्याप एकदाही झालेलं नाही. आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात फायनाचा सामना खेळवला गेला होता. तो सामना देखील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी फायनलच्या दिवशी पावसाने खोडा घातल्याने सामना रिजर्व डे च्या दिवशी खेळवला गेला. रिजर्व डे च्या दिवशी देखील पावसामुळे बराचवेळ सामना थांबवण्यात आला होता. परंतु अखेर काही ओव्हर्सचा सामना खेळवला गेला आणि चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएलचे विजेतेपद जिंकले. पावसामुळे ही आयपीएल फायनल जवळपास 3 दिवस चालली होती.