भारतातील राजवाडे आणि पॅलेस हे अत्यंत सुंदर आहेत. देशातील राजवाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास राजस्थानाचं नाव येतंच. राजस्थानातील सुंदर व भव्य राजवाडे लक्ष वेधून घेतात. पण तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात मोठा राजवाडा एका मराठी राजाने बांधला आहे. कुठे आहे हा पॅलेस जाणून घेऊया.
लक्ष्मी विलास पॅलेस हा अलिशान राजवाडा गुजरातमधील बडोद्यात आहे. शेजारच्या राज्यात असला तरी हा राजवाडा एका मराठी राजाने बांधला आहे. विशेष म्हणजे, ब्रिटनच्या बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही चार पट मोठा असा पॅलेस आहे.
लक्ष्मी विलास पॅलेस हा जगातील सर्वात मोठे खासगी निवासस्थान म्हणूनही ओळखले जाते. बडोद्यातील गायकवाड राजघराण्याचा हा राजवाडा आहे. बडोद्यातील लक्ष्मी विलास पॅलेसला ऐतिहासिक संदर्भदेखील आहेत.
बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी 1890मध्ये हा राजवाडा बांधला होता. तेव्हा या बांधकामावर सुमारे 60 लाखांचा खर्च झाला होता.
लक्ष्मी विलास पॅलेस हा इंडो सारासेनिक आर्किटेक्चरल शैलीचे उत्तम उदाहरण आहे. 500 एकरावर हा राजवाडा दिमाखात उभा आहे. या राजवाड्यात 170 खोल्या आहेत.
राजवाड्यात प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांच्या काही निवडक चित्रांचा समावेश आहे. राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये व्हेनेशियन शैलीची फरशी आहे.
राजवाड्याचा एक भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. तसंच, राजवाड्यात एक खासगी गोल्फ कोर्सदेखील आहे. पॅलेसमधील मोती बाग पॅलेस आणि महाराजा फतेहसिंग संग्रहालय असलेले दरबार हॉल प्रमुख आकर्षणाचे केंद्र आहेत.
लक्ष्मी विलास पॅलेस हे जगातील सर्वात मोठी खासगी निवासस्थान आहे. सध्या या राजवाड्यात वडोदराचे राजघराण्याचे राजे समरजितसिंह गायकवाड, त्यांची पत्नी राधिकाराजे गायकवाड आणि त्यांच्या दोन मुली राहतात.