Shinde Uddhav Fadnavis Fight For This Constituency Thackeray Gave Rich Candidate: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या मतदारसंघामधून वाटाघाटी सुरु आहेत. त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाने आपल्या पहिल्याच यादीत उमेदवार जाहीर केला आहे. या उमेदवारीच संपत्ती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात तपशील...
ठाणे लोकसभा मतदासंघावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं होम ग्राऊण्ड असलेल्या या मतदारसंघासाठी भाजपा एवढी अडवणूक करेल असं शिंदे समर्थकांना वाटलं नव्हतं. जवळपास दोन वर्षांपूर्वी शिंदेंसाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडणाऱ्या भाजपा आणि फडणवीस ठाणे मतदारसंघ सहज सोडण्यास तयार दिसत नाहीत. ठाणे किंवा कल्याण या दोनपैकी एक मतदरासंघ सोडावा अशी भाजपाची आग्रही भूमिका असल्याचं समजतं.
एकीकडे शिंदे आणि भाजपामध्ये वाटाघाटी सुरु असताना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिंदेंसहीत 40 आमदार पक्षातून बाहेर पडल्यानंतर ठाण्यासारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंसोबत राहिलेलं एक मोठं नाव म्हणजे राजन विचारे. विद्यमान खासदार असलेल्या विचारेंवर ठाकरेंनी तिसऱ्यांदा विश्वास दाखवत खासदारकीचं तिकीट दिलं आहे. मात्र ही निवडणूक आधीच्या 2 निवडणुकांप्रमाणे विचारेंसाठी फारशी सोपी नसेल.
सध्या राजकीय संघर्षामुळे राजन विचारेंना उमेदवारी मिळालेला ठाणे मतदारसंघ चर्चेत असला तरी सलग दोनदा खासदार राहिलेल्या विचारेंची संपत्तीही चर्चेचा विषय ठरत आहे. ठाण्यातून शिंदे गट लढणार की भाजपा हे निश्चित होणं शिल्लक असतानाच त्यांच्याविरुद्ध उभे असलेले विचारे किती श्रीमंत आहेत हे पाहूयात...
राजकारणाबरोबरच ठाकरे कुटुंबाबरोबर जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध असलेल्या राजन विचारेंची एकूण संपत्ती 18 कोटी 14 लाख 41 हजार 465 रुपये इतकी आहे. तर आपल्यावर 5 कोटी 40 लाख 80 हजार 233 रुपयांचं कर्ज आणि देणं बाकी असल्याचं विचारे यांनी 2019 साली लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
आपल्या संपत्तीच विवरण देताना विचारे यांनी आपण उद्योजक असून पत्नीही उद्योजक असल्याचं नमूद करत एकूण 7 बँकांमध्ये आपली खाती असल्याचं सांगितलं आहे. या बँकांमध्ये राजन विचारे आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने एकूण 81 लाख 25 हजारांच्या ठेवी असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. अभुदय बँक, बेसिन कॅथलिक बँक, सारस्वत बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ठाणे जनता सहकारी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत ही खाती असल्याचा उल्लेख विचारे यांनी केला आहे.
सारस्वत बँक आणि भवानी पतपेढीमध्ये विचारेंनी शेअर्सच्या माध्यमातून गुंतवणूक केली असून ही गुंतवणूक एकूण 7 लाख 92 हजार रुपयांहून अधिकची आहे. एलआयसी आणि विमा पॉलिसीअंतर्गत 20 लाखांच्या ठेवी असल्याचं विचारेंनी सांगितलं आहे.
राजन विचारे यांनी त्यांच्याकडे फोर्ड एन्डेव्हर, मर्सिडीझ बेन्झ, टोयोटा फॉर्च्युनर, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ अशा एकूण 5 कार असल्याचं नमूद केलं असून या कार्सची एकूण किंमत 1 कोटी 66 लाखांहून अधिक आहे.
पत्नी आणि आपल्याकडे मिळून सव्वा किलो सोनं असल्याचं विचारेंनी म्हटलं आहे. या सोन्याची 2019 मधील किंमत 12 लाख 36 हजार इतकी होती.
इतर गुंतवणुकीमध्ये पती-पत्नी दोघांच्या नावे एकत्रितरित्या एकूण 54 लाख 79 हजार रुपये असल्याचंही विचारेंनी सांगितलं आहे.
स्थावर मालमत्तेमध्ये राजन विचारेंच्या नावावर एकूण रत्नागिरी आणि अलिबागमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 15 प्लॉट आहेत. या शेत जमिनीची एकूण किंमत 1 कोटी 32 लाखांहून अधिक आहे. शेती योग्य नसलेला एक छोटा जमिनीचा तुकडा विचारेंच्या नावावर ठाण्यातील नौपाडा येथील भगवती शाळेजवळ असून त्याची किंमत 50 लाख रुपये असल्याचं विचारेंनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
राजन विचारेंच्या नावावर ठाण्यातील चरईमध्ये 2 कमर्शिएल प्रॉपर्टी म्हणजेच गाळे आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर जांभळी नाका, चरई आणि ठाकूर निवास येथे दोन छोटी दुकानं आणि 900 स्वेअर फुटांचा गाळा आहे. दोघांच्या नावावर असलेल्या या गाळ्यांची एकूण किंमत 5 कोटी 61 लाखांहून अधिक आहे.
राजन विचारेंच्या नावावर ठाण्यात 2 घरं आहेत. यापैकी पहिलं घर 1574 स्वेअर फुटांचं असून त्याची किंमत 1 कोटी 35 लाख इतकी आहे. तर दुसरं घर हे 3 हजार 317 स्वेअर फुटांचं असून हे घर 2018 मध्ये 5 कोटी 85 लाखांना विकत घेण्यात आलं आहे. तसेच विचारेंच्या नावावर गुहाघर येथे एक 850 स्वेअर फुटांचं घरही आहे. या तिन्ही घरांची एकूण किंमत सव्वासात कोटींहून अधिक आहे.
ठाकरेंचे खंदे समर्थक असलेल्या विचारे यांनी सारस्वत बँकेकडून 34 लाखांचं कार लोन घेतलं आहे. तर पत्नीनेही सारस्वत बँकेकडून एकूण 29 लाखांचं कार लोन घेतल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. दोघांचं एकूण वाहनकर्ज 63 लाख 38 हजार इतकं आहे.
विचारे आणि त्यांच्या पत्नीने खासगी तसेच त्यांच्या मालकीच्या कंपन्यांसाठी घेतलेल्या कर्जाचे एकूण मूल्य 4 कोटी 41 लाखांहून अधिक आहे. तसेच इतर शिल्लक देयक 34 लाख 49 हजारांहून अधिक असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
याच प्रतिज्ञापत्रात विचारे यांनी आपण 12 व्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मुंबईतील विद्याविहारमधील एस. के. सोमय्या विद्यालयातून प्रथम वर्षाच्या कनिष्ठ विद्यालयाची परीक्षा दिली आहे असं नमूद केलं आहे. आपल्याविरोधात एकूण 9 गुन्हे दाखल असल्याचंही त्यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे.
मागील 10 वर्षांपासून ठाणेकरांचे प्रश्न लोकसभेत मांडण्याचं काम खासदार राजन विचारे करत आहेत. 2014 मध्ये ते 2 लाख 81 हजारांहून अधिक मतांनी निवडून आले होते. तर 2019 मध्ये मताधिक्याचा आकडा हा तब्बल 4 लाख 12 हजारांहून अधिक होता. मात्र राजन विचारेंचा दोन्ही वेळेस झालेला विजय हा मोदी लाटेत झाल्याचं ठाण्याच्या राजकीय वर्तुळात बोललं जातं. यंदा शिंदे गट आणि भाजपा राजन विचारेंच्याविरोधात उमेदवार देणार असल्याने त्यांच्या समार्थ्याचा खरा कस लागणार आहे.