Bollywood Actress 10th Results Marks: दहावी महत्त्वाचा टप्पा असला तरी याच गुणांवर सर्वकाही अवलंबून असतं असं समजून कमी गुण मिळाल्यास खचून जाण्याची गरज नाही, हे उदाहरणासहीत स्पष्ट करतात त्या बॉलिवूडच्या अभिनेत्री. प्रसिद्ध अभिनेत्रींना नेमके किती गुण होते दहावीमध्ये ते पाहूयात...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहाव्या इयत्तेचा म्हणजेच एसएससी बोर्डाचा निकाल आज म्हणजेच 13 मे रोजी जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला असून कोकण विभागानं मारली बाजी. कोकण विभागाचा एकूण निकाल 98.82 टक्के लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजेच 90.78 टक्के इतका लागला आहे.
अर्थात दहावीची परीक्षा हा शैक्षिणक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र दहावीला कमी मार्क मिळाल्याने निराश होण्याची किंवा पुढील सर्व मार्ग बंद झाले असं काहीही नसतं हे विद्यार्थ्यांना पालकांनी समजावून सांगण्याची गरज असते. आज यशस्वी असलेल्या अनेक व्यक्तींना दहावीला फारसे छान गुण मिळाले नव्हते असं इतिहासात डोकावून पाहिल्यास दिसतं. आज आपण दहावीच्या निकालानिमित्त प्रसिद्ध अभिनेत्रींनी दहावीत किती गुण कमावलेले ते पाहणार आहोत.
अभिनेत्री कृती सनॉन ज्या प्रकारे आपल्या अभिनयाचा छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडते तसाच तिने तिच्या हुशारीचा छाप दहावीच्या निकालावर सोडला. कृतीने दहावीला 72 टक्के मार्क मिळवलेले.
महेश भट यांची लेक अभिनेत्री आलिया भट्ट ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. अभिनेता रणबीर कपूरबरोबर सुखाचा संसार करत असलेली आलिया हुशार विद्यार्थिनी होती. तिने दहावच्या परीक्षेत 71 टक्के गुण मिळवले होते.
अभिनयाचा बाळकडू मिळालेल्या नव्या अभिनेत्रींपैकी आणखी एक अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर! प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची थोरली मुलगी असलेली जान्हवी शाळेत फारच हुशार होती. तिने दहावीला 84 टक्के गुण मिळवले होते.
आपल्या आगळ्यावेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री भूमी पेडणेकरने दहावीत 78 टक्के गुण मिळवलेले.
बॉलिवूडमध्ये राहूनही घरातील संस्कारामुळे मराठमोळंपण जपणारी अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूर ही मराठी चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. श्रद्धाने दहावीला 70 टक्के गुण मिळवले होते.
सर्व अभिनेत्रीमध्ये सर्वात हुशार अभिनेत्री निघाली ती अनुष्का शर्मा! जगप्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी म्हणून मागील काही काळापासून विराटच्या संभाव्य निवृत्तीमुळे चर्चेत असलेल्या अनुष्काने दहावीत धकामेदार कामगिरी केलेली. तिने दहावीला 93 टक्के गुण मिळवलेले.
ज्येष्ठ अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा अभिनेता टायगर श्रॉफबरोबर अनेकदा नावं जोडलं जात असणारी अभिनेत्री म्हणजे दिशा पटाणी! दिशा पाटणीने दहावीमध्ये अवघे 64 टक्के गुण मिळवले होते. या यादीमध्ये दिशा ही सर्वात कमी गुण मिळवणारी म्हणजेच ढब्बू अभिनेत्री आहे.