महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख अखेर समोर आली आहे. गुरुवारी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर महाराष्ट्राचा नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे.
महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख अखेर समोर आली आहे. गुरुवारी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर महाराष्ट्राचा नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे.
येत्या 5 डिसेंबरला महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीला सर्व आमदारांना उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तसंच मुंबईबाहेरील आमदारांनी मुंबईत येण्यासाठी तयार राहावे, अशीही सूचना यावेळी करण्यात आली. तसंच महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करा, असं आवाहनही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आलंय.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार, माध्यमं जो चेहरा दाखवतात तोच मुख्यमंत्री होणार असं, भाजप नेते सुधीर मनुगंटीवार यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितलं.
दरम्यान महायुतीच्या नव्या सरकारचा फॉर्म्युला ठरलाय. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार, अशी माहिती अजित पवारांनी दिलीय. तर 'दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री होणार असल्याचं ठरलंय, असंही त्यांनी सांगितलंय.
महायुती सरकारचा मंत्रिपदांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय. शिवसेनेला 9 कॅबिनेट 3 राज्यमंत्रिपदं दिले जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीला 6 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं मिळणार असल्याची खात्रीदायक सूत्रांची माहिती आहे.
शिवसेनेला नगरविकास खातं मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
गृहमंत्रिपद भाजपकडंच राहणार असल्याचे वृत्तही समोर येत आहे.