How to reach Kaas Plateau : पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणामध्ये एका ठिकाणाचं नाव आवर्जून घेतलं जातं. हे ठिकाण म्हणजे साताऱ्यातील कास पठार.
तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : मुंबई आणि पुण्यापासून काही अंतरावर असणारं सातारा अनेकांच्याच आवडीचं ठिकाण. ऋतू कोणताही असो, सातारा कधीच इथं येणाऱ्या कोणाचाही हिरमोड करत नाही.
अशा या साताऱ्यामध्ये एक कमाल ठिकाण आहे. श्रावणसरींना सुरुवात झाली की त्यादरम्यानच या ठिकाणाला वेगळाच नूर येतो आणि पाहता पाहता एका वेगळ्याच दुनियेत आल्याची अनुभूती इथं येताच होते. हे ठिकाण आहे कास पठार.
जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठारावर दरवर्षीप्रमाणं यंदाही काही दुर्मिळ फुलांना बहर येण्यास सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर न मिळालेली उघडीप यामुळे इथं आता काही प्रमाणात फुलांचे ताटवे पाहायला मिळत आहेत.
कास पठारावर यंदाच्या वर्षी तब्बल सात वर्षांनी फुलणारी टोपली कारवी ही सुद्धा बहरल्यामुळं यंदा तिचं दर्शनही पर्यटकांना घडणार आहे. याशिवाय लहानमोठी अनेक आकाराची आणि रंगांची फुलं या कास पठाराचं सौंदर्य येत्या काही दिवसांत वाढवताना दिसतील.
दरवर्षी हजारो पर्यटक या कास पठाराला भेट देत असतात आणि निसर्गाची मुक्तहस्ताने उधळण असणाऱ्या या ठिकाणाला डोळे भरून पाहतात. सप्टेंबर च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पठार पूर्ण पणे रंगीबेरंगी फुलांनी फुलून जाईल.
इथं तुम्ही स्वत:चा वाहनानं पोहोचणार असाल तर मुंबईपासून हे अंतर आहे 280 किमी. म्हणजेच साधारण 6 तासांचा प्रवास. पुण्यापासून कास पठार गाठायचं झाल्यास 125 किमी अर्थात साधारण 2.30 तासांचा प्रवास करावा लागतो. इथं पोहोचण्यासाठी मुंबई बंगळुरू महामार्गावरून वाट धरत सातारा एक्झिट पकडणं हा सोयीचा मार्ग.
मुंबई आणि पुण्याहून सातारा दिशेनं जाणाऱ्या बसनं कास पठारावर पोहोचता येऊ शकतं. साताऱ्याहून कासला पोहोचण्यासाठी बस किंवा शेअर ट्मटम तुम्ही करू शकता.