'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापनंतर आता निमिश कुलकर्णीही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याने साखरपुड्याचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले असून या फोटोंमुळे निमिशची होणारी पत्नी कोण, यावर चर्चा सुरू झाली आहे. पाहूयात त्यांचे हे खास फोटोज.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम महाराष्ट्रासह जगभरात लोकप्रिय ठरला आहे. या शोमुळे अनेक नवोदित कलाकारांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली असून त्यांनी आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
या शोमधील एक लोकप्रिय अभिनेता निमिश कुलकर्णी सध्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे.
अभिनेता निमिश कुलकर्णीने नुकताच आपला साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. त्याने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून सर्वांना सुखद आश्चर्याचा धक्का दिला.
निमिशची होणारी पत्नी कोमल भास्कर ही देखील मराठी मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. ती अनेक मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून काम पाहते. साखरपुड्याचे फोटो शेअर करताना कोमलने लिहिलं, 'एक नवी सुरुवात... आता आयुष्यभर आम्ही सोबत असू...' यासोबतच तिने साखरपुड्याची तारीखही नमूद केली होती. त्यांचा साखरपुडा 25 जुलै 2025 रोजी झाला.
साखरपुड्याच्या समारंभात निमिशने पांढऱ्या रंगाची डिझायनर शेरवानी परिधान केली होती, तर कोमलने जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. दोघांनीही हातातील एंगेजमेंट रिंग दाखवत खास फोटोशूट केलं आहे.
निमिशने पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहत्यांसह सहकलाकारांनीही कमेंट्सचा वर्षाव केला. निखिल बनेने लिहिलं, 'अभिनंदन निमू आणि कोमू, बाकी भेटलो की बोलूच आपण...'
समीर चौघुले, गौरव मोरे, शिवाली परब, आशुतोष गोखले, वनिता खरात, पृथ्विक परब, प्रियदर्शिनी जाधव , निरंजन कुलकर्णी आणि स्पृहा जोशी यांनीही शुभेच्छा दिल्या.
निमिश कुलकर्णीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोबतच अनेक मालिकांमध्ये आणि प्रोजेक्ट्समध्ये अभिनय केला आहे. त्याने सई ताम्हणकरच्या मुख्य भूमिकेत असलेल्या 'अग्नी' या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं असून, त्यात त्याने अग्निशामक दलातील निपुण गिरीश नागपूरकर ही भूमिका साकारली आहे.