Prithvik Pratap Love Story: काही दिवसांपूर्वीच पृथ्वीक प्रतापने आपल्या लग्नाची गोड बातमी दिल्यानंतर त्याची पत्नी आहे तरी कोण? या दोघांचं नेमकं जुळलं कसं? दोघांपैकी कोणी कोणाला कसं प्रपोज केलं? यासंदर्भात चाहत्यांना उत्सुकता असतानाच याबद्दल दोघांनी नुकताच एका मुलाखतीत खुलासा केला. दोघांच्या प्रपोजलच्या किस्स्यामध्ये बेस्ट बसचं विशेष योगदान राहिलं ते कसं हे पाहूयात...
अभिनेता पृथ्वीक प्रतापने काही दिवसांपूर्वीच लग्न केल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवरुन दिली.
पत्नी प्राजक्ता वायकुळबरोबरचे छान फोटो शेअर करत पृथ्वीक प्रतापने ही गूड न्यूज चाहत्यांना दिली. मात्र पृथ्वीच्या पत्नीबद्दल अनेकांना ठाऊक नसलं तरी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी एकमेकांना होकार कसा दिला याबद्दल भाष्य केलं आहे.
प्राजक्ता आणि पृथ्वीकने 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, ज्या दिवशी पृथ्वीकला हो म्हणाली त्या दिवशी मी त्याच्या आईला आणि मामीला भेटले होते. त्या भेटीनंतर मी त्याला होकार दिला, असं सांगितलं.
पृथ्वीकने प्राजक्ताकडून लग्नासाठीचा होकार बेस्टच्या बसमधील प्रवासानंतर मिळाल्याचा किस्सा सांगितला.
विक्रोळीवरुन बोरिवलीला आम्ही C-60 बसने जातो. त्या दिवशी आईला भेटवून आणल्याने चांगला दिवस आहे म्हणून आम्ही एसी बसने गेलो. 524 नंबरच्या एसी बसने आम्ही गेलो होतो, अशी आठवण पृथ्वीने सांगितली.
अगदी तारखेसहीत तपशील पृथ्वीकने या मुलाखतीत सांगितला. "त्यावेळेस दिवाळीची तयारी सुरु होती. त्या दोघींच्या (आई आणि प्राजक्ताच्या) भेटीत छान गप्पा झाल्या. 30 ऑक्टोबरची तारीख होती त्या दिवशी," असं पृथ्वीक म्हणाला.
"तुझ्या मनात जे असेल ते सांग, असं मी तिला म्हणालो. त्यावर, कळवते सांगते असं ती म्हणाली. मी मात्र तिच्याकडून उत्तर हवच अशा भूमिकेत होतो. आम्ही दोन ते तीन तासात पाच ते सहा बस सोडल्या. आता जी येईल ती बस पकडायची असं ठरलं आणि त्यावेळी एसी बस आली. तिचं 100 रुपये तिकीट होतं. मी बोरीवलीपर्यंत जाणार होतो पण ती नाही म्हणाली. तर मी पवई आयआयटीची तिकीट काढली," असं म्हणत पुढला किस्सा पृथ्वीकने प्राजक्ताला सांगायला सांगितला.
"मी फार बेसिक प्रश्न विचारला होता," असं म्हणत प्राजक्ताने पुढील होकाराची गोष्ट सुरु केली. "जर तुला आयुष्यात सिलेक्शन करायची वेळ आली आई किंवा प्राजक्ता? तू काय सिलेक्ट करशील, असं पृथ्वीकला विचारलं," असं प्राजक्ताने सांगितलं.
"त्याचं उत्तर त्याला (पृथ्वीकला) देता आलं नाही. तो बोलता बोलता बोरीवलीपर्यंत आला. तो म्हणाला याचं उत्तर मी नाही देऊ शकतं. मी यामधून सिलेक्ट करु शकत नाही. मी त्याला म्हटलं की, मी हो म्हणतेय तुला. आपण लग्न करतोय. माझा विचार एवढाच होता की, जर तो माझ्यासाठी त्याच्या आईला नाही सोडत आहे तर इतर मुलीसाठी मला नाही सोडणार," असं प्राजक्ता त्यावेळेच्या संभाषणाची आठवण सांगताना म्हणाली.
पृथ्वीकने प्राजक्ताच्या प्रश्नाला उत्तर का देता आलं नाही याचं स्पष्टीकरण या मुलाखतीत दिलं. "मी तिला म्हटलं की तू प्रश्न फार कठीण विचारला आहे. मला वेळ का लागतोय ते सांगतो," असं कौटुंबिक प्रश्नासंदर्भात बोलताना पृथ्वीक म्हणाला.
"मी म्हटलं सगळं मान्य पण आई नाही सोडणार. आई प्रॉब्लेम असेल तर आपलं नातं थांबवू असंही मी तिला म्हटलं," असं पृथ्वीक म्हणाला.
"आई तुझ्यासाठी बाहेरुन बघताना अडचण वाटू शकते पण माझ्यासाठी नाही," असं आपण प्राजक्ताला सांगितल्याचं पृथ्वीक मुलाखतीत म्हणाला.
"आई नाही सोडू शकतं असं सांगितल्यावर तिची प्रतिसाद काय असेल मला कळेना. मग ती हसली, लाजली! मी म्हटलं काय गं तेव्हा ती म्हणाली सोपा विचार आहे की तो त्याच्या आईला नाही सोडत तर आपल्यालाही नाही सोडणार त्यानंतर ती मला म्हटली की हो," असं पृथ्वीकने होकार मिळाल्यासंदर्भातील आठवणी जागवताना म्हटलं.
"आधी मला पृथ्वीकडून कुटुंबाची पार्श्वभूमी ठाऊक होती. त्यांनी कसं मुलांना वाढवलं वगैरे. जर इतकं असतानाही मुलीसाठी आई सोबत नाही राहायचं असं म्हणत असतील तर मग कठीण आहे. मग ते नातं कुठपर्यंत टिकेल याची गॅरंटी तु ही नाही देऊ शकत आणि मीही," असंही प्राजक्ताने म्हटलं.
पृथ्वीक अनेकदा त्याच्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर करत असतो. इन्स्टाग्रामवर त्याने अनेकदा कौटुंबिक फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळालं आहे.