Ajit Pawar On Government School: राज्यातील मराठी माध्यमाच्या काही शाळा या इंग्रजी माध्यमात परिवर्तित कराव्या लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलणे झाले आहे. 30 हजार शिक्षकांची भरती करत असताना त्यात इंग्रजी माध्यमासाठीच्या शिक्षकांची देखील भरती केली जाणार आहे, असे अजित पवार म्हणाले.
Pune Ajit Pawar: सरकारी शाळा टिकाव्यात यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात. पण असे असताना आमदार,खासदारांची मुले मात्र शासकीय शाळांऐवजी खासगी शाळांमध्ये शिकताना दिसतात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्ते आणि परखड मतांसाठी ओळखले जातात. प्रश्न कोणताही असो, त्या आपली भूमिका परखडपणे मांडतात.
विद्यार्थ्यांनी इंग्रजी शिकण्यावर भर द्या असा सल्ला अजित पवार यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना दिला आहे. यासोबत अजित पवार यांनी लेखाजोखा मांडत आणि निकालावरुन शिक्षकांचे कान टोचले आहेत.
पुणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण आणि शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.
राज्यातील मराठी माध्यमाच्या काही शाळा या इंग्रजी माध्यमात परिवर्तित कराव्या लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलणे झाले आहे. 30 हजार शिक्षकांची भरती करत असताना त्यात इंग्रजी माध्यमासाठीच्या शिक्षकांची देखील भरती केली जाणार आहे, असे अजित पवार म्हणाले.
यातून वेगळा अर्थ काढायचे कारण नाही. इंग्रजी माध्यमाकडील ओढा आणि गरज लक्षात घेता हा निर्णय घेणार आहोत. मराठी माध्यमाच्या शाळांना कमी लेखणे किंवा त्यांचं महत्व कमी करणे हा उद्देश नाही, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी आमदार, खासदारांची मूले शासकीय शाळेत का शिकत नाहीत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.
आपल्या मुलांना कुठे शिकवायचं हा प्रत्येक पालकाचा अधिकार आहे. त्यामुळे त्यात जाण्यात काही अर्थ नाही.आज गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी घडत आहेत, असे ते म्हणाले.
अगोदर पाचवीपासून असलेलं इंग्रजी आता पहिलीपासून सुरू झालं आहे. कालानुरूप यात बदल केला जातो. बदल करण्याची प्रक्रिया सुरू असते, असे त्यांनी सांगितले.
शिष्यवृत्तीमध्ये अनेक शाळाचा चांगला निकाल लागला आहे, तर काही शून्य लागला आहे. सगळं दिलं जाईल. त्यामुळे ज्यांना हवं आहे ते मिळेल पण शिक्षण सुधारलं पाहिजे, असे आवाहन त्यांन शिक्षकांना केले.
मी मनात काही ठेवून बोलत नाही. नवीन पिढीला ज्ञान दिलं पाहिजे म्हणून सांगत होतो. मळलेल्या वाटेवर जाण्याऐवजी नवीन वाटा चोखाळा असं ते विद्यार्थ्यांना म्हणाले.