Mumbai News : मुंबई रिअल इस्टेट क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी. शहराची प्रगती आणि इतिहास जगलेल्या अन् जपलेल्या या ठिकाणी पालिका नेमकं काय उभारण्याच्या तयारीत?
Mumbai News : आजवर मुंबई शहरामध्ये अनेक मोठे प्रकल्प साकारण्यात आले. या प्रकल्पांनी खऱ्या अर्थानं शहराला नवं आणि तितकंच प्रगतीशील रुप देण्यास हातभार लावला. असाच आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या काळात शहरात साकारला जाणार असून BMC नंसुद्धा त्यासाठी मान्यता दिली आहे.
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या नवीन क्लब हाऊस, बँक्वेट हॉलच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेकडून परवानगी मिळाली असून, घोड्यांच्या शर्यती आणि संबंधित उपक्रमांसाठी जुलै 2024 मध्ये RWITC ला भाड्याने दिलेल्या 93 एकर जागेपैकी 32 एकर जमीन प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे.
लेआउट आणि सब डिव्हिजन प्लॅन मंजूर होत असताना, बांधकामासाठी कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) आणि मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी (MHCC) यासह अनेक महत्त्वाच्या विभागांच्या परवानगीचीही आवश्यकता भासणार आहे.
रेस कोर्स आर्किटेक्ट्सच्या प्रस्तावित 17000 चौरस मीटर क्लबहाऊसमध्ये दोन बेसमेंट पार्किंग लेव्हल आणि सात मजले असतील. वरच्या पाच मजल्यांमध्ये 177 लॉजिंग रूम असतील.
पहिल्या मजल्यावर बेकरी, डिपार्टमेंट स्टोअर, कार्ड आणि टेबल टेनिस रूम, बँक्वेट हॉल, प्ले एरिया, स्विमिंग पूल आणि स्वयंपाकघर असेल असं सांगण्यात आलं आहे.
क्लब हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालय, मिनी थिएटर, मीटिंग रूम, फिटनेस सेंटर, रेस्तराँ आणि अतिरिक्त स्वयंपाकघरासाठीची जागा असेल.
बँक्वेट हॉल, स्वयंपाकघर आणि पेंट्रीसह दुसरे क्लबहाऊस देखील इथं नियोजित असल्याचं सांगण्यात येत आहे.
क्लबहाऊस प्रकल्पाचा 120 एकर सार्वजनिक खुल्या जागेवर परिणाम होणार नाही, असंही मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. तेव्हा प्रत्यक्षात हा प्रकल्प तयार झाल्यानंतर त्याचं रुप कसं असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.