IPL 2025 Playoff Senario : आयपीएल 2025 मध्ये 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्सकडून पराभव झाला. त्यामुळे पंजाब किंग्सने टॉप 2 मध्ये स्थान निश्चित केलं तर मुंबई इंडियन्सला पराभवामुळे चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं. त्यामुळे मुंबईला आता 30 मे रोजी एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे. यात संघ विजयी झाला तर क्वालिफायर 2 सामना खेळेल, आणि मग या सामन्याच्या परिणामांवर मुंबईचं फायनलचं तिकीट अवलंबून असेल. मात्र यापूर्वीच एकही सामना न खेळता मुंबई इंडियन्सवर आयपीएलमधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवू शकते. ते कसं याविषयीचं समीकरण समजून घेऊयात.
मंगळवार 27 मे रोजी शेवटचा लीग स्टेज सामना खेळवला जाणार असून त्यानंतर गुरुवार पासून लीग स्टेज सामने खेळवले जातील. 29 मे रोजी क्वालिफायर 1 हा प्लेऑफचा पहिला सामना खेळवला जाईल. तर एलिमिनेटर सामना 30 मे, क्वालिफायर 2 सामना 1 जून रोजी खेळवण्यात येईल. तर फायनल सामना 3 जून रोजी पारपडेल.
आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या 4 संघांनी क्वालिफाय केलं आहे. यातील पंजाब किंग्सने टॉप 2 मध्ये स्थान निश्चित केलं असून मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर क्वालिफाय झाला आहे. तर गुजरात टायटन्स आणि आरसीबी हे संघ कोणत्या नंबरवर लीग स्टेज फिनिश करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना पंजाबच्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. तर तर फायनल आणि क्वालिफायर 2 सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल.
भारतातील विविध राज्यांमध्ये मान्सून वेळेआधीच दाखल झाल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरु झाली आहे. आयपीएल 2025 च्या पूर्वच्या वेळापत्रकानुसार कोलकाता आणि हैदराबाद प्लेऑफ सामने होणार होते. मात्र पावसाची शक्यता जास्त असल्याने बीसीसीआयने पंजाबच्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामने खेळवायचे ठरवले. परंतु हवामान खात्याच्या माहितीनुसार हरियाणा, पंजाब आणि चंडीगढ़ येथे वादळवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयपीएल मध्ये क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना आतापर्यंत पावसामुळे रद्द करण्याची वेळ आलेली नाही. परंतु पावसामुळे पंजाबच्या स्टेडियमवर होणारे क्वालिफायर आणि एलिमिनिटर हे सामने रद्द करण्याची वेळ येऊ शकते. मुंबई इंडियन्सला याच मैदानावर 30 मे रोजी एलिमिनिटर सामना खेळायचा आहे.
क्वालिफायर आणि एलिमिनिटर सामन्यासाठी कोणताही रिझर्व्ह डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे प्लेऑफ सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर त्यासाठी अतिरिक्त दोन तास दिले जातील. जर पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्यात एकही बॉल न टाकता रद्द करण्यात आला तर ग्रुप राउंडमध्ये वरच्या स्थानावर असलेला संघ पुढच्या राउंडसाठी क्वालिफाय करेल. म्हणजेच एलिमिनेटर सामना पावसामुळे रद्द झाला तर चौथ्या क्रमांकांवर असणारी मुंबई इंडियन्स स्पर्धेच्या बाहेर होईल. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना एलिमिनेटर सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊच नये अशी प्रार्थना करावी लागेल.
क्वालिफायर 1 आणि एलिमिनिटर सामन्याप्रमाणे जर अहमदाबादमध्ये होणारा क्वालिफायर 2 सामना सुद्धा पावसामुळे रद्द झाला तर पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहणारा संघ हा फायनलसाठी क्वालिफाय होईल.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल सामना होणार असून या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे 3 जून रोजी सामना झाला नाही तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाईल.