मुंबईच्या सुशोभीकरण आणि सार्वजनिक सुविधा उपक्रमात आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला. मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोच्या एकूण 2.963 खांबांपैकी 2.537 खांबांवर (86%) संकल्पनाधारित रंगकाम पूर्ण करण्यात आले आहे.
मेट्रो मार्गाशी संबंधित खांबांवर विशिष्ट संकल्पना आणि रंगसंगती वापरून रंगकाम करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, एखादा मेट्रो मार्ग ‘रेड लाइन’ म्हणून ओळखला जात असेल, तर त्या मार्गावरील खांब लाल रंगातील डिझाइनद्वारे सजवले जातील, जेणेकरून त्या मार्गाची ओळख स्पष्टपणे अधोरेखित होईल.
एमएमआरडीएतर्फे राबविण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहेच, त्याचबरोबर प्रवाशांना सुलभ मार्गदर्शनही होणार आहे. त्यामुळे विविध मेट्रो मार्ग ओळखणे आणि समजून घेणे अधिक सोपे झाले आहे.
मेट्रोच्या एकूण 2.963 खांबांपैकी 2.537 खांबांवरील रंगकाम पूर्ण झाले असून उर्वरित खांबांचे काम पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
मेट्रो 2बी मार्गिका (डी.एन. नगर - मंडाळे) : एकूण 653 खांबांपैकी 623 खांबांवरील काम पूर्ण झाले असून, 96टक्के लक्ष्य साध्य झाले आहे. केवळ 25 खांबांवर काम बाकी आहे.
मेट्रो 4 व 4ए मार्गिका (वडाळा - कासारवडवली - गायमुख) : एकूण 1023 खांबांपैकी 841 खांब रंगविण्यात आले असून, 82 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 182 खांबांचे काम बाकी आहे.
मेट्रो 5 मार्गिका (ठाणे - भिवंडी - कल्याण) : 488 पैकी 430 खांबांवर आकर्षक रंगकाम करण्यात आले असून, 88 टक्के काम पूर्ण झाले आहे. 58 खांबांचे काम सुरू आहे.
मेट्रो 6 मार्गिका (स्वामी समर्थ नगर - विक्रोळी) : एकूण 422 पैकी 288 खांबांच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून, 68 टक्के लक्ष्य साध्य झाले आहे. उर्वरित 134 खांब रंगवायचे आहेत.
मेट्रो 9 मार्गिका (दहिसर (पूर्व) – मीरा-भाईंदर) : या मार्गिकेवरील काम अंतिम टप्प्यात असून एकूण 354 खांबांपैकी 328 खांब रंगवण्यात आले आहेत. 93 टक्के प्रगती साधण्यात आली असून केवळ 36 खांबांचे काम शिल्लक आहे.
मेट्रो 7ए मार्गिका (अंधेरी (पूर्व) – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) : या मार्गिकेवरील सर्व 22 खांब रंगविण्यात आले असून 100 टक्के काम पूर्ण झाले आहे.