Kabootar Khana History : कबुतरखान्यांचा वाद आणि हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यासंदर्भातील पुढील सुनावणीपर्यंत मुंबई महानगर पालिकेच्या वतीनं शहरातील प्रसिद्ध कबुतरखाने तात्पुरत्या स्वरुपात बहंद करण्यात आले होते. मात्र बुधवारी सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येनं जैन समाजातील नागरिकांना दादर येथील कबुतरखाना परिसरात दाखल होत तिथं ताडपत्री लावून बंद केलेल्या कबुतरखाना भागात एकच गोंधळ घालत पालिकेच्या या भूमिकेचा निषेध केला.
Kabootar Khana History : मुंबईतील दादर इथं असणाऱ्या कबुतरखाना परिसरात तणालाटी परिस्थिती निर्माण झाली, जिथं जैन समाजातील अनेकांनीच यावेळी 'जिओ और जिने दो' अशी घोषणाबाजी करत तिथं ताडपत्री फाडत बांबूंना बांधलेल्या सुतळी कापण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण तणावाच्या परिस्थितीमुळं दादर परिसरामध्ये सकाळच्या वेळी अनेकांसाठीच अडचणी उद्भवल्या आणि स्थानकाच्या दिशेनं ये-जा करणाऱ्यांना मोठ्या गौरसोयीचा सामना करावा लागला. पण, ज्या मुद्द्यामुळं हा संपूर्ण वाद सुरू आहे, त्या कबुतरखान्यांचा मूळ इतिहास काय आहे याची कल्पना आहे का?
कबुतरांना खायला देणं हे एक पवित्र धार्मिक कार्य असून, त्यामुळं पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो अशी जैन धर्मात धारणा आहे. इथं हा विषय जीवदया आणि प्राणीमात्रांविषयीच्या करुणेशी संबंधित आहे. अमावस्येच्या दिवशी या कृतीला विशेष महत्त्वं दिलं जातं. फक्त जैनच नव्हे, तर इतर काही संस्कृतींमध्ये कबुतर म्हणजे पृथ्वी आणि अध्यात्मिक विश्वातील संदेशवाहक असून, त्यांना खाऊ घातल्यानं अध्यात्मिक उर्जेची अनुभूती होत परमात्म्याशी आपण जोडले जातो अशी धारणा आहे.
दादर कबुतरखाना हे जैन मंदिराकडून सुरु करण्यात आलेलं एक खाद्यस्थळ असून, त्यासंदर्भात आणि मुंबईतीच कबुतरांच्या संख्येसंदर्भातील माहिती 'द कॉमन बर्ड्स ऑफ बॉम्बे' या एडवर्ड हॅमिल्टन यांच्या 1909 च्या पुस्तकात आढळते. पूर्वीच्या काळात पक्ष्यांना खायला घालण्यासाठी प्लॅटफॉर्म, तत्सम ठिकाणांवर घरासारख्या वाटणाऱ्या रचना उभारल्या जात, जिथं नियमितपणे धान्य ठेवलं जात असे. याच खाद्यगृहांच्या मोठ्या स्वरुपांना कबुत्रीया, कबुतरखाने असं म्हटलं जाऊ लागलं.
काळ पुढे गेला आणि कबुतरखान्याला धर्मदाय स्थळांचं स्वरुप प्राप्त झालं. आजच्या घडीला मुंबईत 50 हून अधिक कबुतरखाने अस्तित्वात असून, त्यापैकी बहुतांश ठिकाणं मुख्य शहरात आहेत. ज्यामध्ये दादर कबुतरखाना सर्वात जुनी वास्तू असून ती 'दादर कबुतरखाना ट्रस्ट'कडून चालवली जाते.
दादरमधील कबुतरखान्याचा इतिहास 92 वर्षांचा असून, 1933 मध्ये दादरमध्ये कबुतरखाना सुरू करण्यात आला होता. मात्र, त्यामागे धार्मिक भावना नव्हती ही बाब लक्षात घेण्याजोगी.
इतिहासात डोकावलं असता 1944 मध्ये दादर जैन मंदिराकडून या भागात येणारी वाहनांचा पक्ष्यांना धोका असल्यानं कबुतरांसाठी एक संरक्षण कुंपण बांधण्याची परवानगी मागणारं पत्र पालिकेला लिहिलं होतं. ज्याचं उत्तर देत पालिकेनं दादरमधील जैन मंदिराला पक्ष्यांना खाद्य देण्यासाठी वाहतूक बेट किंवा तत्सम वास्तू बांधण्यासाठीचं परवानगी देणारं पत्र जारी केलं
90 च्या दशकापासून मात्र कबुतरांच्या विष्ठेमुळं पसरणारे श्वसनरोग आणि तत्सम कारणांमुळं या चिंतेनं डोकं वर काढण्यास सुरुवात केली. 2014 नंतर शहरातील बरेच कबुतरखाने बंद करण्यात आले. अगदी आताचं उदाहरण घ्यायचं झालं तर, 3 जुलै 2025 रोजी विधान परिषद अधिवेशनादरम्यान उदय सामंत यांनी कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळं श्वसनरोगांचा धोका अधोरेखित करत मुंबईतील 51 कबुतरखाने तात्काळ बंद करण्याची घोषणा केली.
दरम्यान, महापालिकेच्या कबुतर लॉबीतील सूत्रांच्या माहितीनुसार दादरचा ग्रेड 2 वारसा म्हणून जाहीर असल्यानं कबुतरखाना वारसा स्थळांच्या समितीच्या परवानगीशिवाय हटवणं अशक्य असून, आता हीच ढाल पुढे केली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे. वारसास्थळ असल्या कारणानं कबुतरखान्याचा पुनर्विकास हा मुद्दासुद्धा तितकाच महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे.