Mumbai News : मुंबईकर आणि पाणीकपात हे समीकरण आता सर्वज्ञात झालं आहे. दर आठवड्याला कमीजास्त प्रमाणआत शहरातील विविध प्रभागांमध्ये पाणीकपात किंवा पाणीटंचाई लागू असते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवारी, 4 जानेवारी 2024 रोजी अर्ध्याहून अधिक मुंबईमध्ये पाणीकपात लागू असणार आहे.
पालिकेच्या पवई वेन्चुरी येथे असणाऱ्या अप्पर वैतरणा आणि वैतरणातील 900 मिमी व्यास असणाऱ्या एका जलवाहिनीमध्ये पाणीगळती सुरु झाली आहे. त्यामुळं या जलवाहिनी दुरुस्तीचं काम पालिका हाती घेणार आहे.
4 ते 5 जानेवारीदरम्यान हे काम हाती घेण्यात येणार असून, त्यामुळं शहरातील बहुतांश भागांमध्ये 10 टक्के पाणीकपात लागू असणार आहे.
पालिकेच्या सूचनांनुसार गुरुवारी एल वॉर्डमध्ये 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहील. तर, एस विभागात 4 जानेवारीला दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल.
याशिवाय ए, सी, डी, ई, जी उत्तर आणि दक्षिण यासोबतच एच पूर्व आणि पश्चिम या वॉर्डमध्ये 10 टक्के पाणीकपात लागू असणार आहे.
पाणीकपातीच्या या निर्णयामुळं शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहेत. त्यामुळं गुरुवारच्या दिवसासाठी पाण्याचं नियोजन करण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या प्रभागांना या पाणीकपातीचा फटका बसू शकतो त्यामुळं पाणी जपून वापरा!