Hidden Tourist Places in Kokan Maharashtra: कोकणात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी अजूनही पर्यटकांना माहित नाही आहेत. इथं गर्दीचा त्रास नाही. येथे तुम्हाला सुंदर निसर्ग आणि शांतता अनुभवता येते. समुद्रकिनाऱ्यांची शांतता, नितळ पाणी, हिरवीगार सृष्टी आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मंदिरांचा अनुभव घ्यायचा असेल, तर ही ठिकाणं नक्कीच भेट द्या.
कणकेच्या बनात असलेलं प्राचीन महादेवाचं मंदिर म्हणजेच कुणकेश्वर. 11व्या शतकात बांधलेलं हे मंदिर आजही अनेक भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतं. देवगडपासून 18 कि.मी. अंतरावर असलेल्या या गावात एसटीने सहज जाता येतं. बीचवरून दिसणारा मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो. मंदिर परिसरात घरगुती जेवण आणि कोकणातील खास सोलकढी मिळते. येथील प्रवासासाठी देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथून बससेवा उपलब्ध आहे. कुणकेश्वरपासून जवळची पर्यटनस्थळं विजयदुर्ग किल्ला, रामेश्वर मंदिर, देवगड जेट्टी आहेत.
स्वच्छ, सुंदर आणि शांत असलेला मिठमुंबरी बीच कुणकेश्वरपासून अगदी जवळ आहे. येथे फार कमी पर्यटक येतात, त्यामुळे तुम्ही निवांतपणे सुर्यास्तचा आनंद घेऊ शकता. देवगडपासून फक्त 4 कि.मी. अंतरावर असलेला हा बीच मऊ वाळू आणि निळ्या समुद्रामुळे डोळ्यांचं पारणं फेडतो. जवळच तारामुंबरी बीचही पाहण्यासारखा आहे.
देवगड तालुक्यातील हे गाव आपल्या अनोख्या महादेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराचे लाल गुलाबी छत आणि अनोखी स्थापत्यशैली लक्ष वेधून घेते. गावातील कौलारू घरे, भातशेती, नारळ-पोफळीच्या बागा आणि निसर्गाचं सौंदर्य पर्यटकांना मोहात पाडतं. पावसाळ्यात येताना 'दहिबावचा गुप्त धबधबा' आणि गुहा अवश्य पाहा.
देवगड तालुक्यातील मीठबाव गावात वास्तुशास्त्रावर आधारित श्री रामेश्वर मंदिर पाहण्यासारखं आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेलं हे गाव शांततेसाठी आदर्श आहे. हिरवळ, विशाल समुद्र आणि पुरातन मंदिर हे इथलं विशेष आकर्षण आहे.
खूप कमी लोकांना माहिती असलेलं पण निसर्गाची भरभरून भेट मिळालेलं हे गाव म्हणजे तांबळडेग. कुणकेश्वरपासून 15, मीठबावपासून 5 आणि देवगडपासून 30 कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. सुरुच्या बनांतून समुद्राकडे जाणारी वाट आणि किनाऱ्यालगत गजबादेवीचं मंदिर पर्यटकांसाठी एक वेगळीच अनुभूती देतं.
मिठबावजवळ वसलेलं हे मंदिर अत्यंत सुंदर असून फार थोड्या लोकांना याची माहिती आहे. मंदिरासमोरचा स्वच्छ किनारा आणि शांतता यामुळे हे ठिकाण एक आध्यात्मिक, निसर्गरम्य ठिकाण म्हणून उठून दिसतं. येथे एमटीडीसीचे निवास व्यवस्थेसुद्धा उपलब्ध आहे.
आई भराडी देवीचं हे मंदिर प्रसिद्ध असून येथे मोठी यात्रा भरते. देवगडपासून 58 कि.मी. अंतरावर असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी कुणकेश्वर-कटवण-मिठबाव-आचरा तिठा-बांदिवडे-मसुरे असा मार्ग आहे. हा प्रवास दीड तासाचा आहे.
अथांग अरबी समुद्रावर नजर ठेवून उंच डोंगरावरून पवनचक्की पाहण्याचा अनुभव अप्रतिम असतो. इथे सुंगर बाग नावाचं एक सुंदर ठिकाण आहे. समुद्रकिनाऱ्यावर टेबल-खुर्च्यांवर बसून तुम्ही संध्याकाळचे क्षण आनंदात घालवू शकता.
हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला देवगड किल्ला एक ऐतिहासिक ठिकाण आहे. किल्ला पाहताना स्वतःबरोबर पिण्याचं पाणी घेणं आवश्यक आहे. देवगडपासून मालवण 50 कि.मी. आहे. स्वतःचं वाहन असेल तर विजयदुर्ग किल्ला आणि देवगड एकाच दिवशी पाहता येतात. मुंबई-पुण्याहून रेल्वे किंवा एसटीने देवगडला जाता येतं. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिट्ट्यापासून फक्त 40 कि.मी. अंतरावर किल्ला आहे. कणकवली हे जवळचं रेल्वेस्थानक आहे.
देवगड किल्ल्यापासून फक्त साडेतीन किलोमीटरवर असलेला हा बीच फारसा कुणालाच माहिती नाही. नितळ पाणी, स्वच्छ किनारा आणि निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याचा अनुभव घेण्यासाठी 'दर्शन बीच' हा एक उत्तम पर्याय आहे.