Myanmar Earthqake : या इमारती, घरं कोसळली तेव्हा काय परिस्थिती असेल... किंकाळ्या, रडण्याचा आक्रोश... भेदरलेल्या नजरा पाहून मन सुन्न होतंय...
Myanmar Earthqake : म्यानमार, बँकॉक इथं आलेल्या भयावह भूकंपानंतर इथं सर्वत्र विध्वंसाचं विदारक चित्र पाहायला मिळालं. शहरंच्या शहरं उध्वस्त झाली आणि त्यासोबतच उध्वस्त झाली कैक कुटुंब.
म्यानमारम्ये निसर्ग कोपला आणि तब्बल 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर इथं मोठाल्या इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणं कोसळल्या. सुरुवातीला या घटनेत 144 जणांचा मृत्यू ओढावल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
आता मात्र भूकंपात मृतांचा आकडा मोठ्या फरकानं वाढला असून हा आकडा 1000 च्याही पलिकडे पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. सध्याच्या घडीला जखमींचा आकडा 1670 इतका असून येत्या काळात हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं यंत्रणा सांगत आहेत.
म्यानमारमध्ये रस्ते, उड्डाणपूल, इमारतींचं मोठं नुकसान झालं असून यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्ताची हानी झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं जारी केली आहे. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागानं या विनाशपर्वानंतर दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण घटनेनंतर मृतांचा आकडा 10000 पर्यंत जाऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे.
म्यानमारप्रमाणं बँकॉकमध्येही भूकंपामुळं मोठं नुकसान झालं असून, या दोन्ही प्रभावित क्षेत्रांमध्ये इमारतींच्या ढिगाऱ्याखालून शक्य तितक्या माणसांपर्यंत बचावकार्य पोहोचवण्यासाठी देशोदेशीची पथकं दाखल झाली आहेत.
भारतानंकडूनही या भूकंप प्रभावित क्षेत्रातील नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. तर, या संकटसमयी चीन आणि रशियासुद्धा मागे राहिलेले नाहीत.
भारताकडून म्यानमारमध्ये वायुदलाच्या सी 130 या विमानानं चादरी, रजई, स्वच्छतेचं साहित्य, स्लिपिंग बॅग, सोलर लँप, अन्नपदार्थ, स्वयंपाकाचं सामान अशी सर्वतोपरि मदत देऊ करण्यात आली असून या सर्व घटनांवर भारताचं परराष्ट्र मंत्रालय लक्ष ठेवून आहे. (सर्व छायाचित्र- रॉयटर्स)