Jaipur Mumbai Train Shooting: जयपूरवरुन मुंबईला येणाऱ्या जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आज पहाटे सव्वापाच ते साडेपाचच्यादरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. हा संपूर्ण घटनाक्रम धावत्या ट्रेनमध्ये घडला. मृतदेह बोरीवली स्थानकात उतरवण्यात आल्यानंतर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात या डब्याची तपासणी करण्यात आली तेव्हा समोरचं दृष्य पाहून पोलीस आधिकारीही हादरले. ट्रेनमध्ये नेमकी काय परिस्थिती होती पाहूयात फोटो...
रेल्वे पोलीस हवालदारने जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आज (31 जुलै 2023 रोजी) पहाटे सव्वा पाच ते साडेपाचच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याबरोबर 3 प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत.
रेल्वे पोलिसांचा कर्मचाऱ्याने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात आरपीएफच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्याच्या हद्दीत घडला आहे. हवालदार चेतन कुमारने केलेल्या गोळीबारामध्ये आयएसपी टीका राम मीणा यांचा मृत्यू झाला आहे. फोटोत दिसणारी व्यक्ती ही हल्लेखोर चेतन कुमार आहे.
टीका राम (फोटोत उजवीकडे दिसणारे) हे राजस्थानमधील सवाईमाधोपूरमधील श्यामपुरा येथील रहिवाशी होते. टीका राम यांच्याबरोबरच अन्य 3 प्रवाशांचाही या गोळीबारामध्ये मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचे समजते.
धावत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती माहिती मिळाल्यानंतर जीआरपीच्या तुकडीने चेतन कुमारला अटक केली आहे. चेतन कुमारकडे ARM Gun होती. ही बंदूक AK-47 सारखी असते. चेतन कुमारच्या या बंदुकीमध्ये 20 राऊण्ड होत्या. या फोटोत दिसणारी व्यक्ती चेतन कुमार आहे.
चेतनकडे असलेल्या बंदुकीमध्ये एकावेळेस 30 राऊण्ड म्हणजेच गोळ्या लोड करण्याची क्षमता आहे. चेतन कुमारच्या बंदुकीत असलेल्या 20 राऊण्ड्सपैकी 12 राऊण्ड त्याने फायर केल्या. यामध्ये एकूण चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.
बोरीवली रेल्वे स्थानकामध्ये चारही मृतदेह ट्रेनमधून बाहेर काढण्यात आले. हे मृतदेह प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आल्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. शताब्दी रुग्णालयामध्ये हे मृतदेह नेले.
मृतदेह बाहेर काढल्यानंतर जवळजवळ 2 तास ही ट्रेन मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामध्ये थांबवून ठेवण्यात आलेली. बी-5 डब्यामध्ये हा गोळीबार झाला. गाडी मुंबई सेंट्रलमध्ये आली असता पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर आरपीएफच्या अधिकाऱ्यांनाही या ट्रेनची पहाणी केली.
बी-5 डब्यामध्ये हा गोळीबार झाला. आरपीएफ जवानाने वरिष्ठ अधिकाऱ्यावर केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये 3 प्रवाशांनाही गोळ्या लागल्या. ज्या बी-5 डब्यामध्ये हा गोळीबार झाला तो डबा सील करण्यात आला आहे. ट्रेनच्या खिडकीच्या फुटलेल्या काचा अनेक फोटोंमध्ये दिसत आहेत.
रेल्वे पोलिसांकडून आरोपी चेतन सिंहची चौकशी सुरु आहे. तपासामध्ये चेतन कुमारने सुमारे 12 राउंड फायर केल्याचे समोर आले आहे. त्याने AKM हे शस्त्र वापरले, जे AK-47 ची अद्ययावत आवृत्ती आहे. या बंदुकीमधून फार वेगाने गोळ्या झाडल्या जातात. गोळ्या ट्रेनच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर आल्याचं खिडक्या पाहून दिसत आहे.
चेतनने धावत्या ट्रेनमध्ये तीन ठिकाणी गोळीबार केला. चेतन कुमारने बी-5 कोचमधील 2 जणांना ठार केले. यासोबत पॅन्ट्रीमध्ये एका व्यक्तीलाआणि एस-6 मध्ये आणखी एका व्यक्तीला ठार केल्याची माहिती आहे. ट्रेनमध्ये सर्व मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
आरोपी चेतन कुमार हा लोअर परळ स्टेशन आरपीएफ कार्यालयात आहे. मृत एएसआय टिका राम हे दादर आरपीएफमध्ये तैनात होते. आरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेस ट्रेनमध्ये सुरक्षेसाठी एक वरिष्ठ अधिकारी आणि 3 ते 4 पोलीस नेहमीच तैनात असतात. मृत टिका राम हे जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये प्रभारी होते.
हा हल्ला नेमका का करण्यात आला यासंदर्भात सध्या भाईंदर पोलिसांकडून आरोपी चेतन कुमारची चौकशी सुरु आहे. कौटुंबिक कारणामुळे चेतन कुमार मानसिक तणावामध्ये होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.