वंदे भारत स्लीपर ट्रेन आता नव्या रुपात प्रवाशांच्या सोयीसाठी दाखल झाली आहे. देशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली आहे.
वंदे भारत ही सेमी हायस्पीड ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. मात्र, वंदे भारत स्लीपर नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळं अनेकांनी नाराजीही व्यक्त केली होती. आता तीन महिन्यात स्लीपर वंदे भारत धावण्यास सज्ज होणार आहे. रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी पहिल्या मॉडेलची झलक दाखवली आहे.
बंगळुरूच्या कारखान्यात ही ट्रेन तयार करण्यात आली असून पहिले दोन महिने चाचणी घेण्यात येईल त्यानंतर दोन महिने रूळांवर चाचणी घेण्यात येईल. नंतर ही गाडी लाँच करण्यात येणार आहे.
वंदे भारत स्लीपरमध्ये अनेक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. अलिशान व दिमाखदार अशा या गाडीचा लूक दिसत आहे. 800 ते 1200 किमीच्या अंतरावरील प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत धावणार आहे.
नव्या वंदे भारत स्लीपरमधील ट्रेनचे डबे आणि शौचालय अपग्रेड करण्यात आले आहेत. तसंच, सुरक्षेसाठी नवीन फिचर्सदेखील अॅड करण्यात आले आहे.
16 डब्यांची ही गाडी असून वेग ताशी 180 किमी कमाल वेग मर्यादा असणार आहे. राजधानी एक्स्प्रेसपेक्षाही वेगवान प्रवास होणार आहे.
वंदे भारत स्लीपर सीटवर यूएसबी चार्जिंग, रिडिंग लाईट देण्यात आल्या आहेत. तसंच, मॉड्युलर पॅन्ट्री, डिस्प्ले पॅनल आणि सीसीटिव्हीदेखील असणार आहेत.
वंदे भारत स्लीपरच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात गरम पाण्याचा शॉवरची सुविधाही देण्यात आली आहे. तसंच, वरच्या बर्थवर जाण्यासाठी पायऱ्यांची रचना अधिक सुसज्य बनवली आहे.
वंदे भारत स्लीपरचं भाडे किती असेल असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. मात्र, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यमवर्गीयांना विचारात घेऊनच गाडी बनवली असून राजधानी एक्स्प्रेसऐवढेच वंदे भारत स्लीपरचं भाडे असणार आहे.