भारत गौरव टुरिस्ट ट्रेन आज पासून सुरू होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ९ जूनला सकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली.
IRCTC, रेल्वे मंत्रालय, आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष पाच दिवसांच्या या सहलीमध्ये राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा समावेश आहे.
छत्रपती शिवाजीमहाराज यांचा गौरवशाली इतिहास आणि समृद्ध वारशाचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. ही रेल्वेच्या माध्यमातून नागरिक रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लाल महाल, कसबा गणपती, शिवसृष्टी या ठिकाणांना भेट देणार आहे.
भारत गौरव टुरिस्ट ट्रेन यात्रा प्रवाशांना शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि त्यांच्या कार्याचा अनुभव तर देईलच पण त्याचबरोबर प्रवाशांसाठी एक अविस्मरणीय अनुभवदेखील ठरेल.
ही गौरव ट्रेन पहिल्या दिवशी मानगाव रेल्वे स्टेशनवरुन रायगडावर जाणार. तर, दुसरा दिवस लाल महल आणि कसबा गणपतीचे दर्शन करणार.
तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म स्थळ असलेल्या शिवनेरीला जाणार. चौथ्या दिवशी प्रतापगड, त्यानंतर कोल्हापूरला देवी महालक्ष्मी दर्शन केल्यानंतर पन्हाळ्यावर जाणार आणि नंतर मुंबईत येणार.
गौरव ट्रेनमध्ये एकूण 710 प्रवासी आहेत. यात 480 स्लीपर श्रेणीत, 190 3AC आणि 40 सुपीरियर 2AC श्रेणीत असणार आहे.
ही ट्रेन संध्याकाळी उशिरा मुंबईला परत येते आणि सहाव्या दिवशी सकाळी मुंबईला पोहोचते. सर्व श्रेणींमध्ये सर्वसमावेशक किमतीत रेल्वे प्रवास, संबंधित श्रेणींमध्ये आरामदायी हॉटेलमध्ये रात्रीचा मुक्काम, सर्व जेवण (फक्त शाकाहारी), बसमधील सर्व ट्रान्सफर आणि पर्यटन स्थळे, प्रवास विमा, टूर एस्कॉर्ट सेवा इत्यादींचा समावेश असेल. प्रवाशांना सुरक्षित आणि संस्मरणीय अनुभव देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न केले जातील.