Raj And Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबातील चुलत बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय.
5 जुलै 2025 रोजी मुंबईत एक संयुक्त मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आहे, ज्याला ‘मराठी विजय दिवस’ म्हणून संबोधले जात आहे.
महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेला तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला उद्धव आणि राज ठाकरे यांनी तीव्र विरोध केला, ज्याला त्यांनी ‘हिंदी लादणे’ असे संबोधलं जातंय.
दोघांनी सुरुवातीला 6 आणि 7 जुलै रोजी स्वतंत्र मोर्चे काढण्याची घोषणा केली होती. मात्र, गुरुवारी (27 जून 2025) राज ठाकरे यांनी शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क साधून एक संयुक्त मोर्चा काढण्याचा प्रस्ताव मांडला. उद्धव ठाकरे यांनी तात्काळ याला होकार दिला, आणि 5 जुलै रोजी एकत्रित मेळाव्याचे आयोजन निश्चित झाले.
हा मेळावा मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी असल्याचं म्हटलं जातंय. या संयुक्त मेळाव्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या राजकीय युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एकत्र येणे महत्त्वाचे मानले जात आहे. शिवसेना (यूबीटी) गेल्या 25 वर्षांपासून बीएमसीवर वर्चस्व राखत आहे, पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा सांगितल्याने ठाकरे बंधूंसमोर आव्हान आहे.
ठाकरे बंधूंची एकता मराठी माणसाच्या मतांना एकत्र आणू शकते, ज्याचा फायदा बीएमसी निवडणुकीत होऊ शकतो, असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान ठाकरे बंधुंच्या भेटीचा एक किस्सा समोर आलाय. जेव्हा राज यांनी उद्धव ठाकरेंसाठी कार चालवली होती.
2012 मध्ये उद्धव ठाकरे यांना हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हा त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांनी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यासाठी स्वतः कार चालवली होती. हा किस्सा ठाकरे कुटुंबातील राजकीय आणि वैयक्तिक नातेसंबंधांमधील एक महत्त्वाचा क्षण मानला जातो. कारण याच काळात उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील राजकीय मतभेद शिगेला पोहोचले होते.
2012 मध्ये उद्धव ठाकरे यांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी (angioplasty) ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करून उद्धव यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले. बाळासाहेब यांच्यासाठी ठाकरे कुटुंबातील एकता आणि कौटुंबिक बंध महत्त्वाचे होते, आणि त्यांनी राज यांना तातडीने रुग्णालयात येण्यास सांगितले.
2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) स्थापन करून स्वतंत्र राजकीय मार्गावर होते. टोकाचे राजकीय मतभेद असतानाही बंधू प्रेमापोटी राज ठाकरे तात्काळ रुग्णालयात पोहोचले.
उद्धव यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, राज यांनी स्वतः कार चालवत उद्धव यांना मातोश्री या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानी सुखरूप पोहोचवले. या घटनेला "राम-भरत मिलाप" असे संबोधले गेले. कारण दोघे भाऊ राजकीयदृष्ट्या एकमेकांपासून दुरावले असताना या कौटुंबिक संकटाच्या वेळी त्यांनी एकत्र येण्याचा संदेश दिला.
2003 मध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले, आणि याच काळात राज ठाकरे यांना पक्षात दुय्यम स्थान मिळत असल्याची भावना निर्माण झाली. यामुळे 2005 मध्ये राज यांनी शिवसेना सोडली आणि 2006 मध्ये मनसे स्थापन केली. या मतभेदांमुळे दोघांमधील राजकीय अंतर वाढत गेले होते.राजकीय मतभेद असूनही, ठाकरे कुटुंबातील कौटुंबिक बंध कायम होते.
राजकीय मतभेदांमुळे ही जवळीक फार काळ टिकली नाही. याच वर्षी (2012) नोव्हेंबरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले, आणि त्यानंतर ठाकरे कुटुंबातील राजकीय विभागणी अधिक स्पष्ट झाली. पण आता महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येत आहेत.
राज ठाकरेंनी निवडणूक प्रचारात हा किस्सा सांगितला होता. जेव्हा उद्धव आजारी पडले तेव्हा मी पहिली गाडी घेऊन तिथे गेलो होतो, असे राज म्हणाले. मी अलिबागमध्ये असताना मला बाळासाहेबांचा फोन आला. ते म्हणाले, अरे, तुम्हाला माहिती आहे का? हे असं घडलंय. त्यावर मी हो. मी जातोय, असे म्हणाल. मी कधीही राजकारणाला कुटुंबासमोर येऊ दिले नाही, नातेसंबंध आणि राजकारण कधीही मिसळू नये, असे बाळासाहेब सांगायचे असेही राज यांनी म्हटले होते.