Rinku Singh And Priya Saroj Networth : भारताचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज (Rinku Singh And Priya Saroj) यांचा साखरपुडा सोहळा रविवार 8 जून रोजी पार पडला. तेव्हा दोघांच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊयात.
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या नात्याची चर्चा जानेवारी महिन्यापासूनच सुरु होती. दोघे लवकरच विवाह करणार असून त्यांच्या नात्याला दोघांच्या कुटुंबाकडून सुद्धा संमती असल्याचे समोर आले होते. 8 जून रोजी लखनऊच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये रिंकू आणि सरोज यांचा साखरपुडा संपन्न झाला. यावेळी राजकीय, क्रीडा विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
रिंकू सिंह आणि प्रिया सरोजच्या या खास सोहळ्याला बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. साखरपुड्याला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि पक्षाचे तब्बल 25 खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. याशिवाय अनेक VVIP पाहुणेही या समारंभाला उपस्थित होते.
साखरपुडा झाल्यावर आता रिंकू सिंह आणि प्रिया सरोज हे दोघे 18 नोव्हेंबर रोजी वाराणसी येथील आलिशान हॉटेल ताजमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळतेय.
प्रिया सरोज उत्तर प्रदेशातील मच्छलीशहरमधून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आल्या. या विजयामुळे त्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात निवडून आलेल्या दुसऱ्या सर्वात तरुण उमेदवार ठरल्या. तुफानी सरोज या समाजवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत, या कनेक्शनमुळेच अखिलेश यादव यांनी प्रिया सरोज यांना तिकीट देऊन त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
समाजवादी पक्षाच्या खासदार असण्यासोबतच सुप्रीम कोर्टात वकील असून प्रॅक्टिसही करतात. प्रिया सरोज कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असायची. दिल्ली विद्यापीठातून बीए आणि नोएडा येथील एमिटी विद्यापीठातून एलएलबीची पदवी प्राप्त केली आहे.
प्रिया सरोजने निवडणुकीपूर्वी तिच्या एकूण संपत्तीबाबत खुलासा केला होता. प्रियाकडे 11,25,719 रुपयांची संपत्ती आहे. तिच्या यूनियन बँक अकाउंटमध्ये 10 लाख रुपयांपेक्षा अधिक सेविंग्स आहेत. मागच्या वर्षी निवडणुकांच्यावेळी प्रिया सरोजकडे 5 ग्रॅम सोनं होतं. प्रिया सरोजच्या नावावर अजून कोणतीही कार किंवा घर रजिस्टर नाही.
रिंकू सिंहने वर्ष 2023 मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं. 2018 पासून तो आयपीएलमध्ये खेळतोय. मीडिया रिपोर्ट्सनुसार रिंकूची एकूण संपत्ती 7 ते 8 कोटींच्या घरात आहे. रिंकू सिंहकडे बीसीसीआयचे ग्रेड-सीचं कॉन्ट्रॅक्ट असून ज्यातून त्याला दरवर्षी 1 कोटींची सॅलरी मिळते.
आयपीएलमधून रिंकू सिंहची चांगली कमाई होते. आयपीएल 2025 मध्ये केकेआरने रिंकूला 13 कोटींना रिटेन केलं. रिंकूचं अलीगढ़मध्ये एक घर असून त्याची किंमत 3 कोटी रुपये आहे.