Dhananjay Munde Property Details: मागील काही आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक सरकारवर दबाव टाकत असल्याचं दिसून येत आहे. असं असतानाच धनंजय मुंडेंची संपत्तीही चर्चेत आहे. त्यावर टाकलेली ही नजर...
धनंजय मुंडे सध्या वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आहेत. अशातच त्यांच्या संपत्तीचीही जोरदार चर्चा असल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण शेतकरी असल्याचं म्हटलं असून त्यांच्याकडील एकूण संपत्ती किती आहे याबद्दलचा तपशीलही त्यांनी दिला आहे. जाणून घेऊयात याचसंदर्भात....
बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. असं असतानाच या प्रकरणाशीसंबंधित खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करुन त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा थेट राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी अनेक भाषणांमधून आणि मुलाखतींमधून सूचक पद्धतीने तसेच थेटही धनंजय मुंडेंवर काही गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराडकडे शेकडो कोटींची संपत्ती असल्याचा आरोप धस यांनी केला आहे. त्यामुळेच वाल्मिकच्या संपत्तीबरोबरच त्याचं धनंजय मुंडेंशी असलेले कनेक्शनही चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंची एकूण संपत्ती किती आहे हे जाणून घेऊयात...
धनंजय मुंडेंवर एकूण चार गुन्हे दाखल आहेत. यापैकी एक गुन्हा मुंबईत तर अन्य तीन बीडमध्ये दाखल आहेत. मुंबईतला गुन्हा 2019 साली दाखल करण्यात आला आहे. तर बीडमधील गुन्हे 2013, 2015 आणि 2019 मध्ये दाखल करण्यात आले आहेत.
धनंजय मुंडेंनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं तेव्हा त्यांच्याकडे 7 लाख 40 हजारांची रोख रक्कम होती. तर नातेवाईकांकडे साडेसात लाखांपेक्षा अधिक रोकड असल्याने एकूण रोकड 14 लाख 95 हजार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंच्या नावावर बीडमधील यूनियन बँकेबरोबरच स्टेट बँकेत खातं आहे. तसेच परळीमधील स्टेट बँक ऑफ इंडिया, बीड डीडीसी, बँक ऑफ महाराष्ट्र, वैद्यनाथ अर्बन सहकारी बँक, एचडीएफसी बँकेत खाती आहेत. तसेच पुण्यातील आयसीआयसीआय बँक, मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडिया, परळीतील गांधी मार्केटमधील स्टेट बँक ऑफ इंडिया, अंबेजोगाईमधील राजश्री शाहू ग्रामीण प्रतिष्ठान बँक, मुंबईतील नरीमन पॉइण्टमधील यस बँकेत खातं आहे. एकूण 16 बँकेत धनंजय मुंडेची खाती आहेत. या खात्यांवर एकूण 40 लाखांहून अधिक रुपये आहेत.
तर कुटुंबियांच्या नावावरही अनेक बँकांमध्ये खाती असून धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे बँकेत एकूण 1 कोटी 62 लाख 35 हजारांहून अधिक संपत्ती आहे.
याशिवाय धनंजय मुंडेंच्या नावावर वैद्यनाथ साखर कारखाना, परळीमधील वैद्यनाथ बँक, दिन दयाळ नागरी बँक, यासहीत इतरही अनेक ठिकाणी शेअर्स आणि बॉण्ड्स आहेत. याशिवाय कुटुंबियांच्या नावावरही वेगवेगळे बॉण्ड्स असून य शेअर्स आणि बॉण्ड्सची एकूण किंमत 2 कोटी 35 लाखांहून अधिक आहे.
एलआयसी आणि विमा पॉलिसींचा विचार केल्यास धनंजय मुंडेंचा नावार एलआयसीमध्ये 16 लाखांहून अधिकचा विमा आहे. तसेच एचडीएफसी, आयसीसी प्रेडेंशीअल, पीएनजी मेट लाइफ आणि बजाज अलायन्सच्या विमा पॉलिसी पकडून एकूण 17 लाखांहून अधिकच्या विमा पॉलिसी आहेत.
घरच्यांच्या नावावरही अनेक विमा पॉलिसी असून एकूण कुटुंबाच्या नावावर 47 लाख 18 हजारांहून अधिक रक्कमेचा विमा आहे.
धनंजय मुंडेंकडे चार चारचाकी वाहनं आहेत. यामध्ये 2 टाटा टर्बो ट्रक टँकर प्रत्येकी 12 लाख तसेच 13 लाखांची टोयोटा इनोव्हा कारही आहे. तसेच धनंजय मुंडेंकडे 1 कोटींची मर्सिडीज बेन्झ जीएल एस 400 कार असून एक लाखांची रॉयल इन्फिल्डही आहे. धनंजय मुंडेंच्या नावावरच 1 कोटी 38 लाखांहून अधिक किंमतीच्या गाड्या आहेत.
कुटुंबियांकडे टाटाची एक्झा आणि महिंद्राची स्कॉर्पिओ अशा दोन कार आहेत. मुंडे कुटुंबाकडे एकूण 1 कोटी 87 लाखांहून अधिक मूल्य असलेली वाहनं आहेत.
धनंजय मुंडेंकडे 7 लाखांचं सोनं असून त्याचं वजन 190 ग्रॅम इतकं आहे. तर पत्नीकडे 22 लाखांचं सोनं आहे. ज्याचं वजन 620 ग्रॅम असून त्यांच्याकडे दीड किलो चांदीही आहे. चांदीचं मूल्य 72 हजार रुपये इतकं आहे. मुंडे कुटुंबाकडे एकूण 30 लाख 65 हजारांचे दागिने आहेत.
धनंजय मुंडेंकडे स्वत:कडे एकूण 4 कोटी 47 लाखांहून अधिकची जंगम मालमत्ता असून कुटुंबाकडील एकूण जंगम मालमत्तेचा आकडा 6 कोटी 78 लाखांहून अधिक आहे.
धनंजय मुंडेंच्या नावावर एकूण शेत जमिनीचे तीन तुकडे आहेत. या जमिनीचं एकूण क्षेत्रफळ 10 एकरांपेक्षा अधिक आहे. या जमिनीचं मूल्य 60 लाखांहून अधिक आहे. कुटुंबाच्या नावावर शेत जमिनीचे चार तुकडे असून सर्व शेत जमिनींचं एकूण मूल्य 1 कोटी 90 लाखांहून अधिक आहे.
बिगर शेतीच्या दोन जमिनी धनंजय मुंडेंच्या नावावर असून या जमिनींपैकी एक तुकडा 5 कोटी 81 लाखांचा असून दुसरा सव्वा कोटींचा आहे. एकूण 7 कोटी 8 लाखांची बिगर शेतीची जमिनी त्यांच्या नावर आहे.
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या नावावर 5 कोटींचं घर असून पुण्यातील शिवाजी नगरमध्ये त्यांच्या नावावर 1 कोटींचा फ्लॅट आहे. तसेच घरच्यांच्या नावावर पुण्यात आणि मुंबईत फ्लॅट आहेत. तसेच परळीमध्येही घरच्यांच्या नावर फ्लॅट आहेत. घरच्यांच्या नावावरील तीन घरांची किंमत 16 कोटींहून अधिक आहे. मुंडे कुटुंबाकडील पाचही घरांची एकूण किंमत 24 कोटी 8 लाखांहून अधिक आहे.
धनंजय मुंडेची एकूण स्थावर मालमत्ता 14 कोटी 92 लाखांची असून कुटुंबाकडील स्थावर मालमत्तेची किंमत 33 कोटींहून अधिक आहे.
शेती हा आपला मुख्य व्यवसाय असल्याचं धनंजय मुंडेंनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं असून आमदार म्हणून मिळणारा पगारही उत्पन्नाचं साधन म्हणून दाखवलं आहे.
धनंजय मुंडेंची एकूण संपत्ती 38 कोटी 84 लाख 45 हजार रुपयांहून अधिक आहे. तर त्यांच्यावर एकूण 15 कोटी 49 लाख 12 हजारांचं कर्ज आहे.
धनंजय मुंडेंनी बीडमधून 2024 ची विधानसभा निवडणूक लढताना जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही सर्व माहिती देण्यात आली आहे. हे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.