Satara Kaas Pathar in Maharashtra: कास पठार म्हटलं की डोळ्यांसमोर येते निसर्गानं मुक्त हस्तानं केलेली उधळण.. दुर्मिळ अशा रंगीबेरंगी फुलांचा गालिचा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक देश-विदेशातून सातारा जिल्ह्यातल्या कास पठारावर हजेरी लावतात. पावसाळा संपत आला की कास पठारावर रंगी बेरंगी फुलांना बहर येतो. यंदा मात्र, मे महिन्यातच कास पठारावरील फुलांना बहर आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय आहे.
सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाने गेल्या आठ दिवसांपासून झोडपले आहे. कास पठार परिसरात गेल्या दोन दिवसांपासून उघड झाप पावसाची बघायला मिळत आहे. अशातच यंदा इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात जगप्रसिद्ध कास पठारावर फुले यायला सुरुवात झाली आहे.
मोठ्या संख्येने देशभरासह राज्यभरातून पर्यटक कास पठाराकडे येत आहेत. कास पठारावरील निसर्ग सौंदर्य पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत. कास पठारावर बहरलेली फुल म्हणजे पर्यटकांसाठी लॉटरी लागल्यासारखे आहे.
कास पठारावरील विविध दुर्मिळ फुलांचा रंगोत्सव पाहण्यासाठी देशभरातून आणि परदेशातूनही पर्यटक येथे येतात.
साताऱ्याच्या कास पुष्प पठाराला हेरिटेज दर्जा मिळालेलं आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत कास पठारावरील दृश्य डोळ्यांचं पारणं फेडतं. मात्र यंदा मे महिन्यातच पर्यटकांना हा अनुभव मिळत आहे.
कास पठारावरील हिरव्यागार माळरानावर फुललेली ही रंगीबेरंगी फुल... हा नजारा एखाद्या सुंदर निसर्ग चित्राप्रमाणे भासत आहे.
सातारी तुरा, सोनतारा, भुईकांदा, सापकांदा, त्याचबरोबर विविध प्रकारच्या जातीची छोटी मोठी फुले यायला सुरुवात झाली आहे.
थंड आल्हादायक वातावरण धुके, रिमझिम पाऊस, त्याचबरोबर सातारी तुरा या फुलांचा चार ते पाच प्रकारची फुले उमलल्याने पठारावर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.