Actor Sonu Sood Birthday: अभिनेता सोनू सूदचा आज 50 वा वाढदिवस. लॉकडाऊनच्या काळात देवदूत बनलेल्या सोनू सूदवर शिवसेना चांगलीच भडकली होती. त्यामागचं नेमकं कारण काय? अबिनेता सोनू सूद बॉलिवूडमध्ये नाही पण साऊथमध्ये मात्र अतिशय लोकप्रिय चेहरा आहे. सोनू सूदने खलनायक म्हणून सिनेमात लोकप्रियता मिळवली आहे. 30 जुलै 1973 रोजी पंजाबच्या मोगामध्ये सोनू सूदचा राजपूत कुटुंबात जन्म झाला. सोनू सूदने महाराष्ट्रातील नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमधून इंजिनियरिंग केलं आहे. सोनू सूदचं महाराष्ट्राशी असलेलं हे कनेक्शन कोरोनाच्या लॉकडाऊनकाळात पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
कोरोनासारख्या एका जीवघेण्या विषाणूमुळे संपूर्ण देश स्तब्ध झाला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सरकारने लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला. राज्यांच्या सीमा बंद झाल्यामुळे मुंबईत काम करणारा कामगार वर्ग कामाशिवाय मुंबईत अडकला. आपल्या गावी जाणे कामगार वर्गाला शक्य झाले नाही.
कामाशिवाय हातात पैसे नसताना कामगार वर्ग मुंबईत अडकला. संसर्गजन्य असणाऱ्या कोरोनापासून बचाव कसा करायचा? हा प्रश्न कामगार वर्गासमोर असताना आपल्या गावी कसं जायच? हा प्रश्न सतावणाऱ्यांसाठी सोनू सूद बनला "देवदूत'. लॉकडाऊनमध्ये प्रवाशांना आपल्या मूळगावी सोडवण्यासाठी सोनू सूदने प्रचंड मेहनत घेतली.
सोनू सूदची सगळीकडे चर्चा होत असताना शिवसेनेचे संजय राऊत यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली. सोनू सूदला भाजपने तर पुढे केले नाही? असा सवाल संजय राऊतांनी विचारला. एवढंच नव्हे तर राजकीय लाभ हा सोनू सूदचा हेतू तर नाही ना? यामध्ये राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला बदनाम करण्याचा हा सुप्त हेतू तर नाही? असा सवाल देखील राऊतांनी विचारला होता.
शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील आपल्या स्तंभात संजय राऊत यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन दरम्यान समाजात अचानक वाढलेल्या 'महात्मा सूद'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा हवाला देत ते म्हणाले होते की, सूद त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गैरकृत्यांचा प्रचार करणारा चेहरा तर नाही ना? असा सवाल केला होता.
संजय राऊत म्हणाले होते की, सूद एक अभिनेता आहे, ज्याचा व्यवसाय इतरांनी लिहिलेल्या स्क्रिप्टवर अभिनय करणे आणि त्यातूनच त्याचा उदरनिर्वाह होतो.. सूद यांच्यासारखे अनेक लोक इथे आहेत जे चांगले पैसे मिळाल्यास कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करतील. पुढे राऊत यांनी आरोप केला होती की, भाजपने सोनू सूदला (राजकीयदृष्ट्या) दत्तक घेतले आणि उत्तर भारतीय स्थलांतरित कामगारांमध्ये प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सोनू सूद लॉकडाऊनमध्ये करत असलेल्या कामाचं कौतुक भाजपने देखील केलं आहे. एवढंच नव्हे तर सरकारला जमलं नाही ते अभिनेता सोनू सूद करत असल्याचं सांगून भाजपने सरकारवर टीका देखील केली. मात्र सोनू सूदने केजरीवाल सरकारच्या कार्यक्रम ब्रँड ऍम्बेसेडर झाल्यानंतर सोनू सूदवर आयकर विभागाने छापा मारला.
सोनू सूदने कोणत्याही पक्षाला उत्तर न देता आपलं काम केलं. पण आयकर विभागाकडून सोनू सूदच्या घरावर छापा मारल्यानंतर शिवसेनेने भाजपला मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे म्हटलं. भाजप अशी कृती करुन चुकीचं कृत्य करत असल्याचं सांगत सोनू सूदचं समर्थन केलं होतं.