पालकांनी कितीही चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ घरी तयार केले तरी अनेकदा लहान मुलांचे लक्ष बाहेरच्या जंक फूडकडेच अधिक असते. बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज यांसारखे खाद्यपदार्थ त्यांना नेहमीच आकर्षित करतात. मात्र सतत असे अन्न खाल्ल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशा वेळी त्यांना घरच्या घरीच चविष्ट पण हेल्दी पर्याय देणं हाचं उत्तम उपाय ठरू शकतो. खाली काही सोपे, पौष्टिक आणि आकर्षक पर्याय दिले आहेत, जे तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील.
जर तुमच्या मुलांना चायनीज नूडल्स खायची आवड असेल आणि त्यांनी हट्ट केला, तर आपण मैद्याचे नूडल्स न वापरता वर्मीसेली वापरून नूडल्स तयार करू शकतो. त्यात सिमला मिरची, गाजर, बीन्स यांसारख्या रंगीबेरंगी भाज्या घालून नूडल्स अधिक चविष्ट आणि पोषणमूल्यांनी भरलेले बनवता येतात. ही डिश मुलांना चायनीजसारखी वाटते आणि ते ती आवडीने खातात.
मुलं बर्गर मागू लागल्यास त्याऐवजी त्यांना घरी तयार केलेलं व्हेज सँडविच द्या. तुम्ही उकडलेल्या भाज्यांपासून टिक्की तयार करा. ती ब्राऊन ब्रेडमध्ये भरून त्यात टोमॅटो, काकडी आणि चीज घाला. हे सँडविच चविष्टही असेल आणि आरोग्यदायीही. ब्राऊन ब्रेडमुळे फायबर आणि ऊर्जा दोन्ही मिळते.
जर मुलांना पिझ्झा खायची इच्छा असेल तर मैद्याच्या बेसऐवजी गव्हाच्या पोळीचा वापर करा. त्यावर पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस, थोडं मायोनीज लावून त्यावर सिमला मिरची, टोमॅटो, कांदा, मका, ऑलिव्ह्स अशा आवडत्या भाज्या ठेवा आणि वरून चीज घालून ओव्हन किंवा तव्यावर गरम करा. यामुळे पिझ्झाची चवही मिळेल आणि आरोग्याचाही विचार होईल.
हॉटेलमध्ये मिळणारे फ्रेंच फ्राईज जास्त प्रमाणात तेलकट आणि आरोग्यास धोकादायक असतात. त्याऐवजी घरीच बटाट्याचे फ्राईज बनवा. ते तेलात तळण्याऐवजी एअर फ्रायरमध्ये किंवा ओव्हनमध्ये बेक करून द्या. त्यावर थोडं मीठ, चाट मसाला घालून चव वाढवता येते.
जर मुलं चॉकलेटसाठी हट्ट करत असतील, तर खजूर, काजू, बदाम, अंजीर यांसारखे सुकामेवा त्यांच्या आहारात समाविष्ट करा. तुम्ही याचा हेल्दी चॉकलेट लाडू किंवा एनर्जी बारसारखा पर्यायही घरी तयार करू शकता.
पॅकेज्ड वेफर्समध्ये वापरले जाणारे कृत्रिम घटक आरोग्यास घातक असू शकतात. त्यामुळे घरच्या घरीच कच्च्या केळ्याचे वेफर्स तयार करा. हे ताजे, कुरकुरीत आणि हवे असल्यास कमी तेलातही बनवता येतात.
बाहेर मिळणाऱ्या कोल्ड ड्रिंक्समध्ये साखर आणि कृत्रिम रंग भरपूर प्रमाणात असतो. जो लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतो. त्यामुळे त्यांना आंबा, केळं, चिकू यांचे मिल्कशेक्स, स्मूदीज किंवा लिंबूपाणी अशा नैसर्गिक आणि ताज्या पेयांचा पर्याय द्या.
लहान मुलांचे मन जिंकायचे असेल, तर आरोग्यदायी अन्नालाही चवदार आणि आकर्षक बनवावे लागते. थोडीशी कल्पकता आणि तयारी केली, तर तुम्ही घरच्याघरी असे अनेक पदार्थ तयार करू शकता ज्या मुलांना जंक फूडइतक्याच आवडतील आणि आरोग्याची निगा राखायलाही मदत करतील.