Manoj Bajpayee On Sushant Singh Rajput Troubled By This Thing: मनोजने 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'सोनचिडिया' चित्रपटामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर काम केलं होतं. या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सुशांतने मनोजला त्याला सतावत असलेल्या एका गोष्टीसंदर्भात सांगितलं होतं. याबद्दलचा खुलासा आता मनोजनेच केला आहे. मृत्यूच्या 10 दिवस आधी सुशांतबरोबर काय बोलणं झालं होतं याबद्दलही मनोजने खुलासा केला. तो काय म्हणाला आहे पाहूयात...
मनोरंजनसृष्टीमधील सर्वात संवेदनशील आणि हरहुन्नरी अभिनेत्यांपैकी एक म्हणजे मनोज बाजपेयी! मनोजने 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'सोनचिडिया' चित्रपटामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर काम केलं होतं.
सुशांतबरोबर झालेल्या शेवटच्या संवादासंदर्भात आता मनोजने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली. मात्र सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच त्याच्याबरोबर नेमकी काय चर्चा झालेली याबद्दलची माहिती मनोजने दिली.
सिद्धार्थ खन्नाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोजने सुशांत हा त्याच्यासंदर्भातील तर्कशून्य बातम्यांमुळे चिंतेत होता. तो या साऱ्या गोष्टींना वैतागला होता. या अशा गोष्टींबद्दल सुशांत फारच संवेदनशील होता असंही मनोजने सांगितलं.
"चांगला माणूस होता. फारच छान माणूस होता. चांगल्या माणसावरच परिणाम होतो, बरोबर की नाही? तो अनेकदा येऊन मला विचारायचा की सर मी काय करु? तेव्ही मी त्याला म्हणायचो की, तू या गोष्टी फार गांभीर्याने घेऊ नकोस. मला याची कल्पना होती कारण मी हे भोगलं आहे आणि भोगत आहे. मी आजही हे भोगत आहे," असं मनोज म्हणाला.
"सुशांत फार हुशार आणि फारच संवेदनशील होता," असा उल्लेखही मनोजने केला. सेटवर मी काही मटणाचे पदार्थ बनवायचो ते सुशांतला फार आवडायचे असंही मनोज म्हणाला.
"मी जेवण करायचो आणि ते खाल्ल्यानंतर तो एकदा म्हणालेला की, 'मनोज भाई, मला तुमच्या घरी येऊन एकदा जेवायचं आहे.' मी त्याला, 'मी जेवण बनवलं की लगेच तुला फोन करेन.' असं उत्तर दिलेलं. हाच आमच्यामधील शेवटचा संवाद होता. त्यानंतर 10 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला," असं मनोज बाजपेयीने सांगितलं.
सुशांतने वयाच्या 34 व्या वर्षी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात समजल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती याबद्दल बोलताना मनोजने, "आजही मला विश्वास बसत नाही की तो आपल्यात नाही," असं उत्तर दिलं.
"दोन जण आपल्याला सोडून गेलेत हे मला आजही पटत नाही पहिला म्हणजे सुशांत आणि दुसरा म्हणजे इरफान (खान)! दोघेही फार लवकर गेले. ते आपल्याला सोडून गेलेत हे पचवणं कठीण जातं," असं मनोज म्हणाला.