आरोग्यावर परिणाम करणारी ही AC ची थंडगार हवा नकळत घात करतेय याचा तुम्हाला अंदाज तरी आहे का? जाणून घ्या रुममध्ये का ठेवावी पाण्याची बालदी?
why should you keep Water bucket in ac room : सूर्य आग ओकू लागला किंवा हवेत आर्द्रता वाढली की अनेकांचीच धाव AC लावण्याकडे असते. रुममधील AC लावून त्याचं तापमान अगदी थंडगार होईपर्यंत कमी करत या थंड हवेत विसावण्यालाच अनेकांची पसंती असते.
हाच विसावा देणारा आणि हवाहवासा गारवा देणारा एसी नकळत शरीरावरही परिणाम करत आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? लक्षात घ्या, AC सुरु असणाऱ्या खोलीत किंवा परिसरामध्ये एक विचित्र असा कोरडेपणा जाणवतो. ज्यामुळं घशाला कोरड पडते. त्वचाही रुक्ष असल्याचं जाणवतं. अनेकदा याकडे होणारं दुर्लक्ष महागातही पडतं.
AC मुळं हवेत येणारा कोरडेपणा थेट आरोग्यावर परिणाम करणारा असल्यानं बाहेर शक्य नसलं तरीही घरच्या घरी मात्र त्यावर एक सोपा उपाय करून हवेतील आर्द्रता संतुलित स्वरुपात ठेवता येते. एका प्रतिष्ठित वृत्तसमुहानं बंगळुरूच्या पल्मोनोलॉजिस्ट डॉ. शिवकुमार यांच्या माहितीचा संदर्भ देत यासंदर्भातील उपायाकडे लक्ष वेधलं आहे.
डॉक्टरांच्या मते एसीच्या सततच्या वापरानं हवेतील आर्द्रता कमी होते. एसी ज्यावेळी हवा थंड करते तेव्हा त्यातील आर्द्रताही शोषून घेते. ज्यामुळं नाक, घसा, तोंड आणि त्वचा कोरडी पडत असल्याचं जाणवू शकतं.
एसीमुळं होणारा हा परिणाम टाळण्यासाठी जिथं एसी सुरु आहे त्या खोलीत किंवा त्या ठिकाणी एखाद्या बालदीमध्ये किंवा एखाद्या भांड्यात पाणी ठेवणं फायद्याचं ठरतं. असं केल्यानं तेथील आर्द्रतेत संतुलन राखण्यास मदत होते.
प्रत्यक्षात ह्युमिडीफायरसारख्या यंत्रांइतकी ही पद्धत प्रभावी नसली तरीही काही प्रमाणात मात्र त्यापासून मदत मिळवता येते. ज्यामुळं घरगुती स्तरावर या उपायाचा अगदी सहज अवलंब करता येऊ शकतो.
एसीमुळं कोरडी होत जाणारी हवा आरोग्यावर परिणाम करून त्यामुळं दमा, ब्राँकायटीस, एक्झिमा, नाकातील रक्तस्त्राव अशा समस्या डोकं वर काढू शकतात.
प्राथमिक स्वरुपातच हा सोपा उपाय करून या समस्यांना दूर ठेवता येऊ शकतं. अन्यथा ह्युमिडीफायरचा वापर, पुरेसं पाणी पिणं, माईश्चरायझरचा वापर करणं, मोकळी हवा घरात येऊ देणं या पर्यायांचीही मदत घेता येऊ शकतो.