90 च्या दशकातील या अभिनेत्रीने बॉलिवूडमधील जवळजवळ सर्व सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे. इतकंच नव्हे, तर बॉलिवूडमधील दोन मोठे स्टार तिच्याशी लग्न करण्याचीही इच्छा व्यक्त करत होते. पाहूयात कोण आहे ही अभिनेत्री?
बॉलिवूड अभिनेत्री मुमताज यांनी 'बिंदिया चमकेगी', 'जय जय शिवशंकर', 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चा' आणि 'ये रेशमी झुल्फें' यांसारख्या गाण्यांमधील त्यांच्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली. हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा काही मोजक्या अभिनेत्रींपैकी मुमताज आहेत, ज्यांनी जवळजवळ सर्व सुपरहिट अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.
राजेश खन्ना, शम्मी कपूर, जितेंद्र, धर्मेंद्र आणि देव आनंद यांच्यासोबत त्यांच्या जोडीदाराची केमिस्ट्री गाजली. 31 जुलै रोजी मुमताज आपला 78 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. या निमित्ताने त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही कमी गोष्टी जाणून घेऊयात.
मुमताज यांचे बालपण संघर्षमय होतं. त्यांचे वडील अब्दुल सलीम अस्करी आणि आई शादी हबीब आगा हे इराणमध्ये राहत होते. मात्र, मुमताजच्या जन्मानंतर केवळ एका वर्षात त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मुमताज यांची आई आजीबरोबर राहायला लागली. घरची आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने मुमताज आणि त्यांची बहीण मलायका यांनी लहानपणीच कुटुंबाला आधार देण्यासाठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं.
1952 साली 'संस्कार' या चित्रपटात बालकलाकार म्हणून मुमताज यांनी पहिलं काम केलं. त्यानंतर 'यास्मिन', 'लाजवंती', 'सोने की चिडिया' अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांची छोटी भूमिकाही झळकली. 1963 मध्ये दारा सिंगसोबतच्या 'फौलाद' या चित्रपटातून मुमताज यांना पहिली मुख्य भूमिका मिळाली. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, 'दारा सिंगसोबत काम केल्यानंतर माझ्याकडे चित्रपटांची रांग लागली होती. मी त्यांची नेहमीच आभारी राहीन.'
मुख्य भूमिकांमध्ये नाव कमावण्यापूर्वी मुमताज यांनी काही बी-ग्रेड चित्रपटांमध्येही काम केलं होतं. राजेश खन्नासोबतच्या 1969 च्या 'दो रास्ते' चित्रपटाने त्यांना खरी लोकप्रियता मिळाली. मनोरंजक बाब म्हणजे 'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटातील देव आनंद यांच्या बहिणीची भूमिका सुरुवातीला मुमताज यांना ऑफर करण्यात आली होती. मात्र, त्या काळी त्या टॉप अभिनेत्री असल्याने त्यांनी ती भूमिका नाकारली आणि ती नंतर झीनत अमान यांच्याकडे गेली.
एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मुमताज यांच्या आयुष्यात असा काळही आला जेव्हा त्या स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त झाल्या. आजार उशिरा समजल्याने त्यांना केमोथेरपी घ्यावी लागली. यामुळे त्यांचे केस, भुवया आणि पापण्या सगळे गळून पडले आणि त्या बाहेर जाण्यालाही घाबरत होत्या. 2006 मधील एका मुलाखतीत त्यांनी या कठीण काळाबद्दल उघडपणे सांगितलं होतं.
एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मुमताज यांच्या आयुष्यात असा काळही आला जेव्हा त्या स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त झाल्या. आजार उशिरा समजल्याने त्यांना केमोथेरपी घ्यावी लागली. यामुळे त्यांचे केस, भुवया आणि पापण्या सगळे गळून पडले आणि त्या बाहेर जाण्यालाही घाबरत होत्या. 2006 मधील एका मुलाखतीत त्यांनी या कठीण काळाबद्दल उघडपणे सांगितलं होतं.
मुमताज यांच्या आयुष्याचा एक वेगळाच पैलू म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारे सुपरस्टार्स. शम्मी कपूर आणि जितेंद्र या दोघांनाही मुमताज आवडत होत्या आणि दोघांनाही त्यांच्याशी लग्न करायचं होतं. एका मुलाखतीत मुमताज म्हणाल्या होत्या, 'मी स्वतःला भाग्यवान मानते की इतके मोठे कलाकार माझ्याशी लग्न करू इच्छित होते. मी त्यांच्याकडे आकर्षित झाले होते, पण त्यापेक्षा अधिक काही नव्हतं.'
आपल्या करिअरच्या शिखरावर असतानाच, मुमताज यांनी 1974 मध्ये उद्योगपती मयूर माधवानी यांच्याशी लग्न केलं. तेव्हा त्यांचं वय फक्त 27 वर्षं होतं. लग्नानंतर त्यांनी चित्रपटांना रामराम केला आणि परदेशात स्थायिक झाल्या. त्यांना दोन मुली आहेत- नताशा आणि तान्या. नताशाचं लग्न अभिनेता फरदीन खानसोबत झालं आहे.