Company Goes Door To Door To Verify Staff On Sick Leave: तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण हे अशा कंपनीमध्ये घडलं आहे जिथ केवळ नियमितपणे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्तम हजेरीचा बोनस म्हणून एक लाख रुपयांच्या आसपास बोनस दिला जातो. जाणून घ्या नक्की ही कंपनी कोणती आहे आणि अधिकारी अशाप्रकारे अचानक सिक लिव्ह घेतलेल्यांच्या घरी गेल्यावर काय घडलं याबद्दल...
सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा असून नेमकं असं घडलं तरी काय आणि कर्मचाऱ्यांनी या साऱ्याला कसा प्रतिसाद दिला जाणून घेऊयात...
जगातील सर्वात सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र या चर्चेचं कारण फारसं सकारात्मक नसून वादास कारणीभूत ठरत आहे. टेस्ला कंपनीचे अधिकारी आजरपणाची सुट्टी घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन तपासणी करत असल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.
'टेलीग्राम'ने दिलेल्या वृत्तानुसार, कार्यालयांमध्ये कर्मचारी अनुपस्थित राहण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहननिर्मिती करणाऱ्या कंपनीचे प्रयत्न सुरु आहेत. त्याच मोहिमेअंतर्गत थेट कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन ते खरंच आजारी आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला जो त्यांच्या अंगलट आला.
कंपनीचे अधिकारी 30 जर्मन कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन आल्याची माहिती समोर आल्यानंतर टेस्लाच्या गिगाफॅक्ट्रीचे व्यवस्थापक अॅण्ड्रू थिआरिग, अशाप्रकारे कर्मचाऱ्यांकडे जाणं ही सामान्य बाब असल्याचं म्हटलं आहे. "कामाच्या ठिकाणी कामाची शिस्त पाळा" असा संदेश कंपनी देऊ इच्छिते असं म्हणत अॅण्ड्रू यांनी घरी जाऊन कर्मचारी खरंच आजारी आहेत की नाही हे कंपनीच्या व्यवस्थापकांनी तपासणं योग्य असल्याचं मत व्यक्त केली आहे.
बर्लिनमधील टेस्लाच्या गिगाफॅक्ट्रीमधील कर्मचाऱ्यांनी आजरपणाची सुट्टी म्हणजेच सीक लिव्ह घेण्याचं प्रमाण ऑगस्ट महिन्यामध्ये 17 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जर्मनीमधील वाहननिर्मिती क्षेत्रातील इतर कंपन्यांमध्ये आजारपणाच्या सुट्टीचं प्रमाण हे केवळ 5 टक्के इतकं आहे. गिगाफॅक्ट्रीमध्ये 12 हजार कर्मचारी काम करतात.
जर्मनीमधील आजारपणाच्या सुट्टीचं कर्मचाऱ्यांमधील प्रमाण एवढं वाढलं आहे की कंपनी नियमितपणे कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक हजार युरो म्हणजेच जवळपास 93 हजार रुपये बोनस म्हणून देत आहे. 95 टक्क्यांहून अधिक हजेरी असलेल्या कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जातो. अनेक ठिकाणी आवश्यकतेपेक्षा अधिक सिक लिव्ह घेणाऱ्यांना समज देऊन हा प्रकार कंपनीच्या धोरणांचा चुकीचा वापर करण्यासारखा असल्याचं सांगितलं जात आहे.
जर्मनीमध्ये टेस्लासाठी कार निर्मितीचं काम करणाऱ्या आयजी मेटलने दिलेल्या माहितीनुसार, गैरहजर राहण्याचं प्रमाण एवढं अधिक राहण्यामागील कारण हे कर्मचाऱ्यांकडून अधिक काम करुन घेतलं जातं आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा पुरवली जात नाही हे आहे. कामगार संघटनांनाविरोध करणाऱ्या मस्क यांचंही अनेकदा यावरुन कर्मचाऱ्यांबरोबर वाजलं आहे.
ऑफिसला येण्याचा कंटाळा करणाऱ्या आणि सकाळी बेडवरुन उठायचा कंटाळा येत असल्याने आजारपणाचं कारण देत दांडी मारणाऱ्यांना आमच्या कंपनीत स्थान नाही, असं व्यवस्थापकांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
मात्र अशाप्रकारे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घरी येऊन आजारपणाची शहानिशा करणं अनेक कर्मचाऱ्यांना पटलेलं नाही. त्यांनी याचा निषेध केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अनेकांनी या अधिकाऱ्यांच्या तोंडावरच दारं लावली. तर काहींनी थेट पोलिसांना बोलावण्याची धमकी दिल्याची माहिती टेस्लाचे एचआर निर्देशक एरिक डिमलर यांनी दिली. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. फोटो सौजन्य - रॉयटर्स)