Tunisia Water Quota System: पाण्याची कमतरता हा जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील चर्चेचा मुद्दा असतो. आपल्याकडे मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्येही अधून मधून पाणी कपात होत असते. पण कोट्यानुसार पाणी वाटप करण्याची पद्धत अद्याप आपल्याकडे आलेली नाही. मात्र जगात एक देश असा आहे जिथे अशी सिस्टीम लागू करण्यात आली आहे. हा देश कोणता आहे तिथे नेमके कोणते नियम लागू करण्यात आलेत जाणून घेऊयात...
पाण्याचा अपव्यय करु नये यासंदर्भातील जनजागृती मोहिमा, डिजीटल संदेश आपण अनेकदा पाहिले असतील. पाणी नसेल तर पृथ्वीवरील जीव सृष्टीला मोठा धोका निर्माण होईल. पाणी जपून वापरलं नाही तर भविष्य कठीण आहे यासारख्या गोष्टी तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. (सर्व फोटो रॉयटर्सवरुन साभार)
मात्र अनेकांना अनेकदा सांगूनही पाण्याचा जपून वापर करण्यासंदर्भातील जाणीव झाल्याचं दिसत नाही. त्यामुळेच या गॅलरीमधून आपण अशा एका देशाबद्दल जाणून घेणार आहोत ज्या देशात पाण्याची टंचाई निर्माण झालेली असल्याने थेट कोटा सिस्टीम लागू करण्यात आली आहे.
उत्तर अमेरिकेतील ट्युनिशिया या देशामध्ये आपल्याकडे रेशनला लागू करण्यात आलेल्या कोट्याप्रमाणे पाण्याचा कोटा लागू करण्यात आला आहे. या देशामध्ये पिण्याचं पाणी अगदी थेंब अन् थेंब मोजून मापून दिलं जातं.
पुढील 6 महिन्यांसाठी या देशात ड्रिंकिंग वॉटर कोटा लागू करण्यात आला आहे. येथे शेतीसाठी पाणी मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. शेतीसाठी पाणी वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
ट्युनिशिया सरकारच्या कृषी मंत्रालयाने अनेक महिन्यांपासून देशात दुष्काळा आहे. देशातील बंधाऱ्यांमधील पाण्याची पातळी अगदी 30 टक्क्यांवर गेली आहे. मागील वर्षी देशात कमी पाऊस पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कृषी मंत्रालयाने सांगितलं.
सध्याची दुष्काळाची परिस्थिती पाहून ट्युनिशिया सरकारने रेशन तत्वावर पाणी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच देशामध्ये कार धुण्यावर आणि झाडांना ताजं पाणी (रिसायकल न केलेलं) वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी साफसफाईसाठी पाणी वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
जो पाण्यासंदर्भातील या नव्या नियमांचं उल्लंघन करेल त्याला तुरुंगात टाकलं जाईल असं ट्युनिशिया सरकारने म्हटलं आहे. पाणी कायद्यानुसार नियम मोडणाऱ्यांना 6 दिवसांपासून 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकतो.
नव्या नियमांमुळे स्थानिकांमध्ये संताप आहे. दरम्यान कमी पावसामुळे कमी पीक आल्याने येथील धान्याच्या किंमती वाढल्याने महागाई वाढली आहे.