Ajit Pawar Speech On Vaishnavi Hagawane Death Case: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन सातत्याने होत असलेल्या टीकेला अजित पवारांनी अगदी प्रत्येक मुद्द्याचा उल्लेख करत उत्तर दिलं आहे. अजित पवारांनी नेमके कोणते मुद्दे मांडलेत जाणून घ्या सविस्तरपणे...
बारामतीमधील सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन होणाऱ्या टीकेचा अगदी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला. अजित पवारांनी एकूण 12 मुद्दे मांडत आपलं म्हणणं समोर ठेवलं. ते नेमकं काय म्हणाले पाहूयात...
"एखाद्या लग्नाला गेलो आणि नंतर त्याच्या सुनेने वेडेवाकडे केलं तर त्याचा अजित पवार काय संबंध?" असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन टीका करणाऱ्यांना सवाल केला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांच्या सुनेनं आत्महत्या केल्यानंतर अजित पवारांचे काही जुने फोटो व्हायरल झाले असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी रोखठोकपणे आपली भूमिका आज बारामती दौऱ्यादरम्यान केलेल्या भाषणामध्ये मांडली.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भात समजल्यानंतर आपण तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले, असंही अजित पवार म्हणाले. "मला कळताच पोलिसांना सांगितले ऍक्शन घ्या. सगळे अटकेत आहेत सासरा पळून गेला. पळून पळून जातो कुठं?" असा सवाल करत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
तसेच या प्रकरणाशी आपलं नाव जोडलं जात असल्याच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी थेट जाब विचारला. "यामध्ये अजित पवारांचा काय संबंध? अजित पवार दोषी असतील तर अजित पवारला फासावर लटकावा," असंही अजित पवार म्हणाले.
वैष्णवीच्या लग्नामध्ये हगवणे कुटुंबाला भेट म्हणून देण्यात आलेल्या फॉर्च्युनर कारची चावी अजित पवारांच्या हस्ते देण्यात आल्याचा फोटो व्हायरल झाला असून या फोटोसंदर्भातही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या फोटोवरुन मनसेनंही अजित पवारांवर टीका केली असल्याने अजित पवारांनी विरोधकांना उत्तर दिलं.
"मला सांगितले गाडीची चावी द्यायला सांगितली. मी देता ना पण विचारले," असं अजित पवार म्हणाले. "माझी का बदनामी करता?" असा सवाल अजित पवारांनी विरोधकांना विचारला आहे.
"तरी चावी देताना विचारलं ही खुशाला घेताय की बळजबरीने. आजून ते टीव्हीला आहे. मी कोणाचा मिंदा नाही," असं अजित पवार म्हणाले.
"गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस आयुक्तांना सांगितले कारवाई झाली पाहिजे. माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असली लोक माझ्या पक्षात नको. बहुतेक त्यांचे लव्ह मॅरेज आहे. माझा तिथे काही संबंध नाही. मी फक्त लग्नाला गेलो होतो," असं अजित पवारांनी सांगितलं.
"जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे. पथक नेमली आहेत. माणुसकी म्हणून, जबाबदारी म्हणून जे काही करायचं आहे ते आम्ही केलं आहे," असं अजित पवार म्हणाले.
"पोलिसांना मी त्याला मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणालोय. तीन टीम पोलीसांनी कामाला लावल्या आहेत. पण मीडियाची लोक अजित पवार पवार,अजित पवार," असं म्हणत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.
"अरे मीच पठ्ठ्याने लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायला सुरवात केली. जर अजित पवार दोषी असेल तर खुशाल फासावर लटकवा. आता बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मीच त्याच दिवशी सी पी ला सांगीतले,एकालाही सोडू नका. आज सांगून टाकतो आज पासून त्या बडव्याची माझ्या पक्षातून हकालपट्टी करतो," असं अजित पवार म्हणाले.
"अजित पवारांचा पक्ष... अजित पवारांचा पक्ष... यात माझी काय चूक?" असा थेट सवाल अजित पवारांनी जाहीर भाषणामध्ये उपस्थित केला आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत, सर्व फोटो अजित पवारांच्या फेसबुकवरुन साभार)